Join us

प्रारंभीच्या घसरणीनंतर सावरला बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 12:34 AM

सप्ताहाचा प्रारंभ उत्साहवर्धक होऊनही नंतरच्या घडामोडींनी बाजारामध्ये चिंता निर्माण केल्याने मोठी घसरण बघावयास मिळाली.

- प्रसाद गो. जोशीसप्ताहाचा प्रारंभ उत्साहवर्धक होऊनही नंतरच्या घडामोडींनी बाजारामध्ये चिंता निर्माण केल्याने मोठी घसरण बघावयास मिळाली. मात्र, सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी पावसाबद्दल आलेला सुधारित अंदाज, अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाची कमी झालेली चिंता आणि देशातील सेवा क्षेत्राने बजावलेली चांगली कामगिरी यामुळे वातावरण बदलले आणि सप्ताहाची अखेर तेजीने झाली. परिणामी, निर्देशांकांमध्ये वाढ झाली.मुंबई शेअर बाजारात सप्ताहाचा प्रारंभ तेजीने झाला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३७४९१.३९ असा वाढीव पातळीवर खुला झाला. त्यानंतर हा निर्देशांक ३७७११.८७ अंश असा उच्चांकी, तर ३७१२८.९९ असा नीचांकी राहिला. त्यानंतर, सप्ताहाच्या अखेरीस तो ३७५६६.१६ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये २२९.३१ अंश एवढी वाढ झाली.राष्ट्रीय शेअर बाजारातही सप्ताहामध्ये संमिश्र वातावरण बघावयास मिळाले. येथील निफ्टी या निर्देशांकाने सप्ताहामध्ये ८२.४५ अंशांची वाढ नोंदवित तो ११३६०.८० अंशांवर बंद झाला आहे. मिडकॅप, तसेच स्मॉलकॅप या बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये या सप्ताहातही तेजी दिसून आली. हे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे २९४.२७ आणि ३८३.३२ अंशांनी वाढून १६२०६.८९ अंश आणि १६८३३.५२ अंशांवर बंद झाले.सप्ताहाच्या पूर्वार्धामध्ये भारतीय रिझर्व्ह बॅँकेने सलग दुसऱ्यांदा व्याजदरामध्ये वाढ जाहीर केली. बॅँकेला चलनवाढ होण्याची भीती वाटत असल्याने ही वाढ झाली. परिणामी, अर्थव्यवस्थेच्या वृद्धी दरामध्ये कपात होण्याची शक्यता वाटल्याने बाजारात तीव्र प्रतिक्रिया दिसून आली. उर्वरित दोन महिन्यांत पाऊस कमी होण्याचा खासगी संस्थेचा अंदाज चिंता वाढवून गेला.सप्ताहाच्या अखेरीस अपेक्षेपेक्षा चांगले आलेले आस्थापनांचे निकाल, देशातील सेवा क्षेत्राने नोंदविलेली वाढ आणि सुधारलेले आंतरराष्टÑीय वातावरण यामुळे बाजारात मोठी खरेदी झाली. परिणामी, आधी खाली आलेले निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले.>परकीय चलन गंगाजळीमध्ये झाली घटपरकीय चलन मालमत्तेमध्ये घट झाल्यामुळे देशाच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये ९५० दशलक्ष डॉलरनी घट झाली आहे. २७ जुलै रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये देशाची परकीय चलन गंगाजळी ९५०.९ दशलक्ष अमेरिकन डॉलरने कमी झाली. आता या गंगाजळीमध्ये ४०४.१९२ अब्ज अमेरिकन डॉलर शिल्लक आहेत. आधीच्या सप्ताहामध्ये गंगाजळीमध्ये ६७.७ दशलक्ष डॉलरने वाढ होऊन ती ४०५.१४३ अब्ज अमेरिकन डॉलर झाली होती.सप्टेंबर २०१७ च्या पहिल्या आठवड्यामध्ये परकीय चलन गंगाजळीने सर्वप्रथम ४०० अब्जांचा आकडा पार केला. त्यानंतर, १३ एप्रिल २०१८ रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये गंगाजळीत ४२६.०२८ अब्ज डॉलर अशी उच्चांकी शिल्लक राहिली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे मापन करण्याचे परकीय चलन गंगाजळी हे एक एकक आहे. ही गंगाजळी जेवढी जास्त तेवढी अर्थव्यवस्था मजबूत मानली जाते.

टॅग्स :निर्देशांक