मुंबई : कोरोना व्हायरसच्या साथीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये येणाऱ्या मंदीची पकड शेअर बाजारावर कायम असून, मंगळवारीही बाजारात घसरण झाली. निफ्टीनिर्देशांकाला नऊ हजार अंशांची पातळीही राखता आलेली नाही. प्रारंभी झालेल्या खरेदीमुळे बाजार काही काळ वर गेला होता. मात्र, कालांतराने मंदीची पकड घट्ट होत असल्याच्या जाणिवेमुळे तो खाली आला.
अनेक समभागांच्या कमी झालेल्या किमतींमुळे खरेदीदार पुढे आले होते. ही तेजी अर्धा ते एक तास टिकली. त्यानंतर घसरण सुरू झाली. दिवसभरामध्ये निर्देशांक १६५३ अंशांमध्ये खाली-वर फिरत होता. बाजार बंद होताना हा निर्देशांक ८१०.९५ अंशाने घसरून ३०,५७९.०९ अंशांवर बंद झाला.
निफ्टीलाही विक्रीचा फटका बसला. दिवसाअखेरीस तो ९१९७.४० अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये ७५७.८० अंश म्हणजे ७.६१ टक्क्यांची घट झाली आहे. निफ्टीमध्येही दिवसअखेर घसरण बघावयास मिळाली. हा निर्देशांक २३०.३५ अंश (२.५० टक्क्यांनी) घसरून ८९६७.०५ अंशांवर बंद झाला. सातत्यपूर्ण विक्रीमुळे हा निर्देशांक ९ हजार अंशांच्या पातळीखाली गेला आहे. मंगळवारी बॅँकांच्या समभागांना विक्रीचा मोठा फटका बसला. कोरोना व्हायरसचा मोठ्या वेगाने होत असलेला प्रसार, त्यामुळे जगभरातील उत्पादन ठप्प झाले असून, जागतिक मंदीची भीतीही गडद होत आहे. याचा मोठा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊन तिचा विकासदर कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे जगभरातील गुंतवणूकदार विक्री करताना दिसून येत आहेत.
युरोपमधील शेअर बाजारांमध्येही घट
युरोपमधील शेअर बाजारांमध्ये घट झालेली दिसून आली. येथील शेअर बाजारांमध्ये तीन टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्याचा परिणाम आशियातील निवडक शेअर बाजारांवर होऊन ते खाली आले. शांघाय आणि सेऊलमधील शेअर निर्देशांक घटले, तर हॉँगकॉँग आणि टोकियोमध्ये शेअर बाजारामध्ये वाढ झालेली बघावयास मिळाली.
प्रारंभीच्या वाढीनंतर शेअर बाजार घसरला
प्रारंभी झालेल्या खरेदीमुळे बाजार काही काळ वर गेला होता. मात्र, कालांतराने मंदीची पकड घट्ट होत असल्याच्या जाणिवेमुळे तो खाली आला.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 05:50 AM2020-03-18T05:50:44+5:302020-03-18T05:51:09+5:30