मुंबई : कोणत्याही कारणाने नोकरी सुटल्यानंतरच्या काळात भविष्य निर्वाह निधीच्या रकमेवर जे व्याज मिळेल, त्यावर आयकर भरणे कर कायद्यानुसार बंधनकारक असून, त्यात कोणतीही सवलत मिळू शकणार नाही, असा निर्णय बंगळुरू येथील आयकर अपील लवादाने दिला आहे. एका निवृत्त व्यक्तीच्या प्रकरणाचा निपटारा करताना हा निर्णय लवादाने दिला.लवादाचा हा निर्णय निवृत्त कर्मचाºयांसाठी असला, तरी तो इतर कुठल्याही कारणांनी नोकरी सोडणाºया कर्मचाºयांनाही लागू आहे, असे जाणकारांनी सांगितले.लवादाने ज्याच्या प्रकरणात ताजा निर्णय दिला आहे, ती व्यक्ती सॉफ्टवेअर कंपनीत २६ वर्षांच्या सेवेनंतर १ एप्रिल २००२ रोजी निवृत्त झाली होती. त्याच्या ईपीएफ खात्यावर ३७.९३ लाख रुपये होते. नऊ वर्षांनी ११ एप्रिल २०११ रोजी त्यांनी रक्कम काढली तेव्हा ती ८२ लाख रुपये झाली होती. निवृत्तीनंतर त्यांना ४४.०७ लाख रुपये व्याज मिळाले. हे व्याज करमुक्त आहे, असे गृहीत धरून त्यांनी आपल्या आयकर विवरणपत्रात दाखविले नाही. आढावा प्रक्रियेत मात्र आयकर अधिकाºयांनी त्याला नोटीस बजावून कर भरण्याचे निर्देश दिले. त्यावर त्या व्यक्तीने अपील केले आणि प्रकरण लवादासमोर आले.लवादाने त्यांना कर भरणे बंधनकारक असल्याचा निर्णय दिला. ईवाय या संस्थेचे जाणकारतज्ज्ञ अमरपाल चढ्ढा यांनी सांगितले की, अनेकदा कंपनी कर्मचाºयास काढून टाकते, कर्मचारीच कधी राजीनामा देतो अथवा निवृत्त होतो. अशा कोणत्याही कारणांनी घरी बसल्यानंतर अनेक जण आपले ईपीएफ खाते सुरूच ठेवतात. तथापि, त्यांना कर कायद्याची माहिती नसते. लवादाने ज्या प्रकरणात वरील निर्णय दिला, त्या प्रकरणातही हेच झाले होते.या व्यक्तीने निवृत्तीनंतर आपले ईपीएफ खाते सुरूच ठेवले. त्यांना असे वाटले होते की, या खात्यावरील व्याज करमुक्त आहे. तथापि, वास्तवात हे व्याज नियमानुसार करपात्र आहे. त्यानुसार त्यांना कर लावण्यात आला, त्यावर त्यांनी लवादाकडे अपील केले. लवादाने त्यांचे अपील फेटाळून लावले.निवृत्त कर्मचाºयांसाठी वेगळे नियम-गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जारी झालेल्या एका अधिसूचनेनुसार, एखाद्या कर्मचाºयाने राजीनामा दिला अथवा त्याला कामावरून काढून टाकले गेले तरी त्याचे ईपीएफ खाते सक्रिय राहते.कर्मचारी जोपर्यंत पैसे काढून घेत नाही अथवा नवी नोकरी धरीत नाही, तोपर्यंत त्याला त्यावर व्याजही मिळत राहते. निवृत्त कर्मचाºयांसाठी मात्र नियम वेगळे आहेत. एखादा कर्मचारी ५५ व्या वर्षी निवृत्त झाला असेल, तसेच त्याने ईपीएफची रक्कम काढली नसेल अथवा रक्कम हस्तांतरित केली नसेल, तर तीन वर्षांनंतर त्याचे खाते आपोआपच असक्रिय (इनआॅपरेटिव्ह) म्हणजे बंद होते. तीन वर्षांनंतर त्याला कोणतेही व्याज मिळत नाही.
नोकरी सुटल्यानंतर ईपीएफ व्याजावर द्यावा लागणार कर, निवृत्त कर्मचा-यांसाठी वेगळे नियम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:35 AM