शार्क टँक इंडियाच्या दुसऱ्या सीझनमध्ये एका नव्या शार्कची एन्ट्री झाली होती. त्यांचं नाव म्हणजे अमित जैन. ते कारदेखो डॉट कॉमचे (CarDekho.Com) सह-संस्थापक आहेत. देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभलेल्या मोजक्या भाग्यवान लोकांपैकी ते एक आहेत. अमित जैन यांनी रतन टाटा यांचे ८५ व्या वाढदिवसानिमित्त आभार मानणारी एक मोठी लिंक्डइन पोस्ट केली होती ज्यात त्यांनी अनेक मोठ्या गोष्टींचा उलगडा केला. आपण दिवळखोर झालो आणि नंतर तिथून पुन्हा कशी सुरूवात करून आतापर्यंतच्या उंचीपर्यंत पोहोचलो याची माहिती त्यांनी सांगितली आहे.
“आम्ही (अमित जैन आणि त्यांचा भाऊ) स्टॉक मार्केटमध्ये १.५ कोटी रुपये गमावले आणि दिवाळखोर झालो. साहजिकच ते खूप मोठे नुकसान होते पण आम्हाला माहित होतं की आमच्याकडे मनुष्यबळ आणि मेंदू दोन्ही आहेत. म्हणून आम्ही पुन्हा सुरुवात केली,” असं अमित जैन यांनी म्हटलंय.
रतन टाटा प्रेरणास्थान
अमित जैन हे रतन टाटा यांना त्यांचे आजीवन प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक मानतात. “लोक अनेकदा रतन टाटाजी यांच्या नम्रता, शांत स्वभाव आणि ज्ञानाबद्दल बोलतात. मी साक्ष देऊ शकतो की हे अगदी खरे आहे. २०१५ मध्ये रतन टाटा आमचे मार्गदर्शक बनले. आम्ही कार देखो वाढवण्याचे आणि युनिकॉर्न बनण्याचे स्वप्न पाहत होतो. मी हे पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो की आम्हाला सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक मिळाले याचा मला आनंद आहे. लोक बरोबर म्हणतात की एक मार्गदर्शक असा असावा जो तुमच्यातील क्षमता पाहतो जो तुम्हाला स्वतःमध्ये दिसत नाही आणि तुम्हाला ती विकसित करण्यात मदत करतो,” असं रतन टाटा यांच्याबद्दल अमित जैन यांनी लिहिलंय.
“प्रत्येकाकडे असा एक मार्गदर्शक हवा जो तुम्हाला कठीण काळात प्रेमाने साथ देईल आणि तुमचे सर्वोत्तम देण्यास प्रोत्साहित करेल. हे तुम्ही जयपूरच्या त्या २ उद्योजकांना विचारू शकता जे डोळ्यात मोठी स्वप्नं घेऊन रतन टाटा यांना भेटले होते आणि त्यांना यानंतर आपलं जीवन बदलणारे हेदेखील माहित होतं,” असंही ते म्हणाले.