Petrol-Diesel Price: देशातील वाढत्या महागाईवरुन विरोधक सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. यातच आता, राखीपौर्णमेपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने सामान्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सरकारने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. महागाईने होरपळणाऱ्या जनतेसाठी हा मोठा दिलासा आहे. या निर्णयानंतर आता पेट्रोल-डिझेलच्या दरातही कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. अशा स्थितीत केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याची घोषणा होऊ शकते. 2022 च्या यूपी विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर पेट्रोल आणि डिझेलवरील करात मोठी कपात केली होती.
अलीकडेच टोमॅटोचे भाव किलोमागे 250 रुपयांच्या पुढे गेले होते. त्यानंतर सरकारला सक्रिय व्हावे लागले आणि नेपाळमधून टोमॅटो आयात करावे लागले. टोमॅटोही सरकारला अनुदानावर विकावा लागला. टोमॅटोच्या दरात दिलासा मिळण्यापूर्वीच कांद्याच्या दरात तेजी दिसून आली. भाज्यांच्या वाढत्या किमतीमुळे सरकारवर मोठा ताण निर्माण झाला होता.
जुलैमध्ये किरकोळ महागाईचा दर 7.44 टक्के होता. हा गेल्या 15 महिन्यांतील सर्वोच्च दर आहे. वाढत्या महागाईने सरकार अडचणीत आले आहे. अशा स्थितीत सरकारने एलपीजी गॅसच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होण्याची अपेक्षा आहे.