नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बँकांविरोधात रिझर्व्ह बँक सातत्याने कठोर पावलं उचलत असते. एक दिवसापूर्वी न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेने आणखी दोन बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. नियमांचं उल्लंघन केल्याने रिझर्व्ह बँकेने नैनिताल बँक आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेवर ही कारवाई केली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कर्जावरील व्याजदर आणि बँकांमध्ये ग्राहकांना सेवा देण्याबाबतच्या काही नियमांचं पालन न केल्याने नैनिताल बँक लिमिटेडवर ६१.४० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर काही नियमांचं पालन न केल्याने उज्जीवर स्मॉल फायनान्स बँकेवरही ६.७० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या आधी रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेवरही दंडात्मक कारवाई केलेली आहे.
एवढंच नाही तर रिझर्व्ह बँकेने एनबीएफसी श्रीराम फायनान्सवरही ५.८० लाख रुपयांच्या दंडाची कारवाई केली आहे. श्रीराम फायनान्सवर केवायसीशी संबंधित काही आवश्यक प्रक्रिया आणि क्रेडिटची माहिती न दिल्या प्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे. याआधी गुरुवारी रिझर्व्ह बँकेने मुंबईतील न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर निर्बंध लादले होते. तसेच या निर्बंधांची माहिती मिळाल्यानंतर बँकेतून पैसे काढण्यासाठी बँकेबाहेर ठेवीदारांच्या रांगा लागल्या होत्या.
एनआयसीबीवरील रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांनुसार बँकांचे खातेधारक आपल्या खात्यामधून पैसे काढू शकत नाहीत. हे निर्बंध सहा महिन्यांसाठी लागू राहणार आहेत. हे निर्बंध बँकेवरील देखरेख आणि बँकेतील रोख रकमेत झालेल्या घटीमुळे लादण्यात आले आहेत.