केंद्र सरकारनं आता बासमती तांदळाच्या निर्यातीवर सशर्त बंदी घातली आहे. यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यापूर्वी २० जुलै रोजी केंद्र सरकारनं बिगर बासमती पांढर्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. आगामी सणासुदीचा हंगाम लक्षात घेऊन, देशांतर्गत पुरवठा वाढवून त्यांच्या किरकोळ बाजारातील किमती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशानं सरकारनं हे पाऊल उचललं होतं. यापूर्वी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तुकडा तांदळाची निर्यातही बंद करण्यात आली होती.
या नवीन निर्णयामुळे, १२०० डॉलर्स प्रति टन पेक्षा कमी किंमतीवर सर्व बासमती तांदळाची निर्यात तात्पुरती थांबवली जाईल. दरम्यान, याचा फायदा पाकिस्तानला मिळू शकेल असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२२-२३ या आर्थिक वर्षात भारतानं ४.८ अब्ज डॉलर्स किमतीचा बासमती तांदूळ निर्यात केला. प्रमाणानुसार ही निर्यात ४.५६ दशलक्ष टन होती.
बिगर बासमती तांदळाचा हिस्सा कितीअन्न मंत्रालयानं गेल्या महिन्यात सांगितलं होतं की, देशाच्या एकूण तांदूळ निर्यातीमध्ये बिगर बासमती पांढर्या तांदळाचा वाटा सुमारे २५ टक्के आहे. त्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यानं देशातील ग्राहकांसाठी किंमती कमी होण्यास मदत होईल. धान्याचे भाव वाढल्यानंतर बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
एप्रिल-जून तिमाहीत बिगर बासमती पांढर्या तांदळाची निर्यात वाढून १५.५४ लाख टन झाली. जी मागील वर्षीच्या तिमाहीत ११.५५ लाख टन होती. खरीप पीक वर्ष २०२२-२३ मध्ये देशातील तांदळाचं एकूण उत्पादन १३५.५ दशलक्ष टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, जे एका वर्षापूर्वी १२९.४ दशलक्ष टन होते.