मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी (Anil Ambani) यांची कंपनी रिलायन्स कॅपिटल (Reliance Capital) कर्जाच्या ओझ्याखाली दबली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गौतम अदानी (Gautam Adani) यांची कंपनी अदानी फायनान्शियल सर्व्हिसेस, केकेआर, पिरामल फायनान्स आणि पूनावाला फायनान्ससह १४ बड्या कंपन्यांनी अनिल अंबानींची कंपनी खरेदी करण्यात रस दाखवलाय. ही माहिती समोर आल्यानंतर रिलायन्स कॅपिटलच्या शेअर्सनं रॉकेट स्पीड पकडल्याचं दिसून येतंय.
रिलायन्स कॅपिटलचे शेअर (Reliance Capital Stocks) सोमवारी मुंबई शेअर बाजारावर (BSE) १४.३७ रुपयांवर पोहोचला. रिलायन्स कॅपिटलच्या शेअर्सना अपर सर्किटही लागलं. यापूर्वी ११ मार्च रोजी कंपनीच्या शेअर्सला अपर सर्किट लागलं होतं. रिलायन्स कॅपिटलनं आपल्या इनसॉल्व्हेन्सी रिझॉल्युशन प्रोसिड्स अंतर्गत कंपन्यांकडून एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट मागितला होता. कंपन्यांची आता बिड करण्याची अंतिम तारीख आता वाढवून २५ मार्च करण्यात आली आहे. यापूर्वी ही तारीख ११ मार्च २०२२ होती.
पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार रिलायन्स कॅपिटलसाठी बिड्स जमा करणाऱ्या कंपन्यांमध्ये ऑर्पवुड, वर्दे पार्टनर्स, मल्टिपल्स फंड, निप्पॉन लाइफ, जेसी फ्लॉव्हर्स, ओकट्रीस अपोलो ग्लोबल, ब्लॅकस्टोन आणि हीरो फिनकॉर्प या कंपन्यांचा समावेश आहे.
दोन पर्याय
बोलीदारांकडे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे संपूर्ण कंपनीसाठी (रिलायन्स कॅपिटल लिमिटेड) बोली लावणे. रिलायन्स कॅपिटल अंतर्गत एकूण आठ उपकंपन्या येतात. बोलीदार यापैकी एक किंवा अधिक कंपन्यांसाठी देखील बोली लावू शकतात. रिलायन्स कॅपिटलच्या उपकंपन्यांबद्दल सांगायचे झाले तर त्यात रिलायन्स जनरल इन्शुरन्स, रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स, रिलायन्स सिक्युरिटीज, रिलायन्स अॅसेट री-कन्स्ट्रक्शन कंपनी, रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स यांचा समावेश आहे.
कंपनीवर ४० हजार कोटींचे कर्ज
कंपनीवर एकूण ४० हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे सप्टेंबर २०२१ मध्ये रिलायन्स कॅपिटलने आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना सांगितलं होतं. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा तोटा १७५९ कोटी रुपयांवर आला होता. डिसेंबर २०२० च्या तिमाहीत कंपनीचा एकूण तोटा ३९६६ कोटी रुपये होता. रिलायन्स कॅपिटलची स्थापना १९८६ मध्ये धीरुभाई अंबानी यांनी केली होती.