Adani Train Ticket Booking: उद्योगपती गौतम अदानी आता रेल्वे क्षेत्रातही जोरदार एन्ट्री करण्याच्या तयारीत आहेत. सध्या देशातील सर्वात मोठी पोर्ट आणि एअरपोर्ट ऑपरेटर कंपनी बनल्यानंतर आता अदानी समुहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस या सेगमेंटमध्ये मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. याची सुरूवात कंपनी ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग सेवेपासून करू शकते.
दरम्यान, अदानी समूह स्टार्क एंटरप्रायझेसचा १०० टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. ही कंपनी ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंगसाठी ट्रेनमॅन प्लॅटफॉर्म चालवते. ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंगमध्ये सरकारी कंपनी IRCTC ची मक्तेदारी आहे. परंतु अनेक ट्रॅव्हल आणि टूर ऑपरेटर, युटिलिटी वेबसाइट देखील त्यांच्या पेजवरून तिकीट बुकिंग सेवा पुरवतात.
अदानी डिजिटल लॅबचा भाग होणार
अधिग्रहणानंतर ट्रेनमॅन अदानी ग्रुपच्या 'अदानी डिजिटल लॅब'चा एक भाग असेल. ही अदानी एंटरप्रायझेसची उपकंपनी आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने स्टार्क एंटरप्रायझेसमधील १०० टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी करार केला आहे. मात्र, हा करार किती किंमतीत करण्यात आला याबाबत मात्र कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
अदानी डिजिटल लॅब ही अदानी समूहाचा फ्युचर बिझनेस प्लॅन आहे. या लॅबमध्ये कंपनी अॅप डिझाइनिंग, यूजर इंटरफेस डिझाइन, एसईओ, रिसर्च आणि अॅनालिसिस यांसारखे काम करते. त्याचबरोबर या लॅबमध्ये कंपनीच्या 'अदानी वन' या सुपर अॅपवरही काम सुरू आहे.
काय आहे ट्रेनमॅन?
स्टार्क एंटरप्रायझेसचे ट्रेनमॅन प्लॅटफॉर्म हे आयआरसीटीसी अधिकृत असलेलं ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म आहे. आयआयटी रुरकीचे पासआउट विनीत चिरानिया आणि करण कुमार यांनी याची सुरुवात केली होती. कंपनी सध्या गुरुग्राम येथून काम करत आहे. अलीकडेच, स्टार्क एंटरप्रायझेसनं अमेरिकन गुंतवणूकदारांकडून १० लाख डॉलर्सचा निधी उभारला आहे.