नवी दिल्ली : इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरूच ठेवल्याने राजधानीत डिझेलची किंमत प्रथमच ८० रुपयांच्या पुढे गेली आहे. गुरुवारी सलग १९ व्या दिवशी दरवाढ करण्यात आल्याने डिझेलचे दर एका लिटरला १०.६३ रुपयांनी वाढले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. या वाढीनंतर राजधानी दिल्लीमध्ये डिझेलचे दर लिटरला १४ पैशांनी वाढून ८०.०२ रुपये असे झाले आहेत. प्रथमच डिझेलच्या दराने ८० रुपयांची पातळी ओलांडलेली दिसून आली आहे. गेल्या १९ दिवसांत डिझेल १०.६३ रुपयांनी महागले आहे.पेट्रोलच्या दरामध्येही इंधन कंपन्यांनी लिटरमागे १६ पैशांची वाढ केली आहे. यामुळे दिल्लीमध्ये आता पेट्रोलचे दर ७९.९२ रुपये प्रति लिटर असे झाले आहेत. गेल्या १९ दिवसांत पेट्रोलच्या दरामध्ये एकूण ८.६६ रुपयांनी वाढ झाली आहे.पेट्रोल आणि डिझेलवर विविध राज्य सरकारांकडून अबकारी कर तसेच व्हॅट यांची आकारणी केली जाते. त्यामुळे इंधनाच्या जाहीर झालेल्या दरांपेक्षा प्रत्येक राज्यामध्ये अधिक रक्कम ग्राहकांना मोजावी लागते. पेट्रोल व डिझेल हे जीएसटीखाली आणण्याची मागणी केली जात असली तरी अनेक राज्यांचा त्याला विरोध आहे.
डिझेलची किंमत ८० रुपयांच्या गेली पुढे, पेट्रोलही महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 2:30 AM