Ratan Tata Successor: रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टची धुरा कोण सांभाळणार? हा मोठा प्रश्न होता. दरम्यान, आता टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा (Noel Tata) यांची निवड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नोएल टाटा सध्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट (Sir Dorabji Tata Trust) आणि सर रतन टाटा ट्रस्टचे (Ratan Tata Trust) विश्वस्त आहेत. टाटा सन्समध्ये या दोन्ही ट्रस्टचा मिळून ६६ टक्के हिस्सा आहे. टाटा सन्स ही टाटा समूहाची मूळ कंपनी आहे. दरम्यान, आज टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. यामध्ये नोएल टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
Noel Tata, half-brother of late Ratan Tata, to be next chairman of Tata Trusts, say sources
— Press Trust of India (@PTI_News) October 11, 2024
प्रकाशझोतापासून दूर
एकीकडे रतन टाटा हे हा टाटा समूहाचा प्रमुख चेहरा होते. तर दुसरीकडे नोएल टाटा हे पडद्यामागे काम करणारे आहेत. ते माध्यमांपासूनही दूर राहतात. समूहाच्या जागतिक उपक्रम आणि रिटेल क्षेत्रावर त्यांचे लक्ष होते.
अनेक कंपन्यांची जबाबदारी
नोएल टाटा गेल्या ४० वर्षांपासून टाटा समूहाचा भाग आहेत. सध्या ते टाटा समूहातील अनेक कंपन्यांचे संचालक मंडळाचे सदस्य आहेत. ते टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, व्होल्टास आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आहेत. टाटा स्टील अँड टायटन कंपनी लिमिटेडमध्ये ते उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. नोएल टाटा ऑगस्ट २०१० ते नोव्हेंबर २०२१ दरम्यान ट्रेंटचे व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ट्रेंटची उलाढाल ५०० मिलियन डॉलर्सवरून वाढून ३ बिलियन डॉलरवर गेली. नोएल टाटा यांनी ससेक्स विद्यापीठातून पदवी घेतली आहे. दरम्यान, असं मानलं जातं होतं की टाटा ट्रस्टची कमान अशा व्यक्तीला दिली जाऊ शकते ज्याचं नाव टाटाशी संबंधित आहे. यानंतर आज बैठकीत नोएल टाटांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.