रिलायन्स जिओची २०१६ मध्ये टेलिकॉम सेक्टरमध्ये एन्ट्री झाली. त्यांच्या एन्ट्रीनंतर संपूर्ण दूरसंचार क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला. मुकेश अंबानींच्या ताकदीवर आलेल्या जिओसमोर अनेक जुन्या कंपन्यांना आपलं दुकान बंद करावं लागलं. कंपनी सुरू झाल्यापासून अर्ध्या डझनहून अधिक इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्सनं आपली दुकानं बंद केली आहेत. यामध्ये व्हिडिओकॉन, एमटीएस, एअरसेल, टेलिनॉर, टाटा डोकोमो यांचाही समावेश आहे.
आज, जिओ सर्वात मोठी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहे. त्यांचा बाजारातील हिस्सा निम्म्याहून अधिक आहे. याचा अर्थ, एन्ट्री केल्यापासून अवघ्या ८ वर्षांत, कंपनीनं सर्वात मोठा बाजार हिस्सा मिळवला आहे. सुनील मित्तर यांची एअरटेल ही या क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. बाजारातील हिस्सा पाहता त्याचा हिस्सा सुमारे २८ टक्के आहे. जिओ आणि एअरटेल यांच्या मार्केट शेअरमधला फरक हा मुकेश अंबानींची कंपनी या क्षेत्रात किती वर्चस्व गाजवते हे दाखवण्यासाठी पुरेसा आहे. जिओच्या या साम्राज्याचा अर्थ काय? जिओनं इतक्या कमी वेळात हे कसं साध्य केलं? आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
गेल्या तीन दिवसांपासून मुकेश यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनची चर्चा होती. या सोहळ्यात देश-विदेशातील नामवंत व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. हे मुकेश अंबानींची वाढती शक्ती देखील दर्शवतं, ज्यांनी पेट्रोलियम क्षेत्राच्या पलीकडे तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनच्या क्षेत्रांपर्यंत विस्तार केला आहे. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे जिओ. जिओची एन्ट्री होताच टेलिकॉम सेक्टरमध्ये सर्वांचेच धाबे दणाणले होते.
२०१६ मध्ये ही कंपनी सुरू झाल्यापासून अर्ध्या डझनहून अधिक सर्व्हिस प्रोव्हायडर्सनं आपली दुकानं बंद केली आहेत. यामध्ये एअरसेल, रिलायन्स कम्युनिकेशन्स (अनिल अंबानी), टाटा टेलिसर्व्हिसेस, डोकोमो, एमटीएस, व्हिडिओकॉन, युनिनॉर यांचा समावेश आहे. देशात सध्या सुमारे ८६ कोटी इंटरनेट युझर्स आहेत. यामध्ये जिओचा मार्केट शेअर ५१.९८ टक्के आहे. २८.७९ टक्के मार्केट शेअरसह एअरटेल दुसऱ्या स्थानावर आहे. व्होडाफोन आयडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे (१४.५ टक्के), BSNL, SCT आणि इतरांचा उर्वरित हिस्सा आहे.
कसं प्रस्थापित केलं वर्चस्व?
जिओनं स्वस्त डेटा आणि मोफत कॉलिंग, व्यापक 4G कव्हरेज, डिजिटल सेवांवर फोकस, मजबूत ब्रँडिंग, आक्रमक मार्केटिंग, नाविन्यपूर्ण उत्पादनं आणि सेवांसह ग्राहक सेवेवर लक्ष केंद्रित करून परिस्थिती बदलली. त्यामुळे इतर कंपन्यांना त्यांची बिझनेस स्ट्रॅटजी बदलावी लागली. ज्यांना हे जमलं ते या क्षेत्रात टिकून राहू शकले. ज्यांना तसं करता आलं नाही त्यांना आपला गाशा गुंडाळावा लागला.
नुकसान होऊ शकतं का?
या क्षेत्रात एकाच कंपनीचं वर्चस्व राहिलं तर नक्कीच नुकसान होऊ शकतं. स्पर्धेमुळे ग्राहकांना निवडीचं स्वातंत्र्य मिळतं. इनोव्हेशनलाही चालना मिळते. स्पर्धेमुळे कंपन्या नवनवी प्रोडक्ट इनोव्हेट करतात. एखाद्या क्षेत्रात अनेक कंपन्या असल्याचं मक्तेदारी निर्माण होत नाही. यामुळे मनमानी कारभाराला आळा बसतो.