नवी दिल्ली - टेलिकॉम सेक्टरमध्ये धुमधडाका उडवून दिल्यानंतर आता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने रिटेल सेक्टरमध्ये पाऊल ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. रिलायन्सने ऑनलाइन आणि कन्वेश्नल शॉपिंगचा संयुक्त प्लॅटफॉर्म बनवण्याची तयारी सुरू केली आहे.
रिटेलपासून रिफायनिंगपर्यंतच्या व्यवसायात काम करणारा रिलायन्स उद्योग समूह मोबाइल आणि फायबर ब्रॉडबँड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 2.5 लाख कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यानंतर आता ऑनलाइन मार्केटमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे, असे रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी सांगितले.
गुरुवारी झालेल्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मुकेश अंबानी यांनी येत्या काही दिवसांमध्ये रिलायन्स हायब्रिड आणि ऑनलाइन टू ऑफलाइन न्यू कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये विस्ताराची संधी पाहत आहे. रिलायन्स ग्रुपच्या कंपन्या रिलायन्स रिटेल लिमिटेड आणि रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड मिळून काम करतील." त्याबरोबरच रिलायन्सने 15 ऑगस्टपासून फायबर बेस्ड ब्रॉडबँड सर्विसची सुरुवात करण्याची तयारी केली आहे. मोबाईल सेवेप्रमाणेच रिलायन्सकडून या सेवेमध्येही प्रतिस्पर्धी कंपन्यांना कडवी टक्कर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ब्लुमबर्गमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालामध्ये ई मार्केटरच्या हवाल्याने सांगितले की येत्या काही दिवसांमध्ये भारतात ई कॉमर्स वेगाने वाढणार आहे. 2018 साली भारतातील ई रिटेलचा व्यवसाय हा 32.7 अब्ज डॉलर आहे. हा व्यवसाय येत्या चार वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढून 2022 पर्यंत 72 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकतो.
टेलिकॉमनंतर आता ई रिटेलवर रिलायन्सची नजर
टेलिकॉम सेक्टरमध्ये धुमधडाका उडवून दिल्यानंतर आता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने रिटेल सेक्टरमध्ये पाऊल ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 10:55 PM2018-07-05T22:55:33+5:302018-07-05T22:56:05+5:30