एअर इंडियानंतर आता आणखी एका सरकारी कंपनीची धुरा टाटा ग्रुप आपल्या खांद्यावर घेण्याच्या तयारीत आहे. निलाचल इस्पात निगम लिमिटेड (NINL), असे या कंपनीचे नाव आहे. या कंपनीचे अधिग्रहण चालू तिमाहिच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे टाटा स्टिलचे (Tata steel) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) तथा MD टी व्ही नरेंद्रन यांनी मंगलवारी सायंकाळी सांगितले.
टाटा स्टिलसाठी एनआयएनएलचे हे अधिग्रहण एक मोठे उत्पादन कॉम्प्लेक्स तयार करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. एनआयएनएल हा चार सीपीएसई आणि ओडिशा सरकारच्या दोन राज्य सार्वजनिक उपक्रमांचा संयुक्त उपक्रम आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत प्रक्रिया पूर्ण होईल -
नरेंद्रन मंगळवारी पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले, "चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत NINL च्या अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर, आम्ही आमच्या उच्च-मूल्य असलेल्या किरकोळ व्यवसायाच्या विस्ताराला अधिक गती देऊ." खरे तर, टाटा स्टिलने 31 जानेवारी रोजीच, ओडिशाच्या या कंपनीचा 93.71 टक्के हिस्सा 12,100 कोटी रुपयांत विकत घेतल्याची घोषणा केली होती.
कंपनीवर मोठे कर्ज -
एनआयएनएल कंपनीचा कलिंगनगर, ओडिशा येथे 1.1 एमटी क्षमतेचा एक इंटिग्रेटेड स्टील प्लांट आहे. ही कंपनी अत्यंत तोट्यात सुरू आहे. या कंपनीवर गेल्यावर्षी 31 मार्चला 6,600 कोटी रुपयांहूनही अधिकचे कर्ज होते. 31 मार्च 2021 पर्यंत कंपनीची संपत्ती निगेटिव्ह 3,487 कोटी रुपये आणि संचित घाटा 4,228 कोटी रुपये एवढा होता.