नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या संपत्तीत एका दिवसात 15 बिलियनपेक्षा जास्त घट झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांच्या संपत्तीत गेल्या 24 तासांत 6 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.
इलेक्ट्रिक कार तयार करणाऱ्या टेस्ला कंपनीच्या निराशाजनक वितरणामुळे 4 महिन्यांत त्याचे शेअर्स सर्वात जास्त घसरले आहेत. टेस्लाने गेल्या 3 महिन्यांत आपल्या ग्राहकांना 3,43,830 वाहने वितरित केली, जी ब्लूमबर्ग विश्लेषकांनी नोंदवलेल्या अंदाजे 3,58,000 वाहनांपेक्षा कमी आहे. यामुळे सोमवारी टेस्लाच्या शेअरची किंमत 8 टक्क्यांहून अधिक घसरली.
सहा महिन्यांपूर्वी कंपनीचे शेअर्सने विक्रमी उच्चांक गाठला होता. त्यावेळी कंपनीचे मार्केट कॅप 1.1 लाख कोटी डॉलर पोहोचला होता. जे अर्धा डझन पेक्षा जास्त टॉप ऑटो कंपन्यांच्या एकूण मार्केट कॅपपेक्षा जास्त होते, परंतु गेल्या 6 महिन्यांत कंपनीचे शेअर्स 30 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. 3 जूननंतर कंपनीची ही सर्वात मोठी एकदिवसीय घसरण आहे. त्यामुळे टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांच्या संपत्तीतही लक्षणीय घट झाली आहे.
काय आहे गुंतवणूकदारांचे म्हणणे?
ऐतिहासिकदृष्ट्या कारच्या प्रादेशिक बॅच उत्पादनामुळे प्रत्येक तिमाहीच्या शेवटी आमच्या वितरणाचे प्रमाण कमी होते. आमच्या उत्पादनाचे प्रमाण जसजसे वाढत आहे, तसतसे वाहनांची वाहतूक क्षमता सुरक्षित करणे अधिक आव्हानात्मक होत आहे, असे टेस्लाने एका निवेदनात म्हटले आहे. त्याचवेळी, इलॉन मस्क यांनी एप्रिलमध्ये सोशल मीडिया कंपनी ट्विटर खरेदीची घोषणा केल्यापासून टेस्लाच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत असल्याचे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. मस्क यांचे लक्ष टेस्लावरून बाजूला गेले आहे आणि टेस्ला पुरवठा साखळीच्या समस्यांना तोंड देत आहे, असे गुंतवणूकदारांचे मत आहे.
बँकांनी व्याजदरात वाढ केल्यानेही बाजारात घसरण
दरम्यान, इलॉन मस्क हे टेस्लाचे सीईओ आहेत. टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक वाहने आणि घरगुती सौर बॅटरी विकण्याचे काम करते. मस्क हे SpaceX चे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहेत. बाजारातील टेस्ला ही एकमेव कंपनी नाही, जिच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. तर गेल्या सहा महिन्यांत अनेक टेक कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत. जगभरातील वाढती महागाई आणि चलनवाढ रोखण्यासाठी सेंट्रल बँकांनी व्याजदरात वाढ केल्याने सुद्धा बाजारात घसरण दिसून आली आहे.