Shark Tank India Ashneer Grover : भारत पे (Bharatpe) चे को फाऊंडर आणि शार्क टँक इंडियाचे जज अशनीर ग्रोव्हर यांनी शार्क टँक इंडियामध्ये (Shark Tank India) सहभागी झालेल्या रवी काबरा यांच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी या शोदरम्यान आपला ब्रँड स्किपी पॉप (Skippi pop) च्या १५ टक्के इक्विटीच्या मोबदल्यात १ कोटी रुपयांचं फंडिंग घेतलं होतं. महत्त्वाची बाब ही की त्यांच्या स्किपी पॉपची विक्री आता ४० पटींनी वाढली आहे. अशनीर ग्रोव्हर यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे.
अशनीर ग्रोव्हर यांनी काबरा यांच्या या यशाला सर्वात मोठं यश असल्याचं म्हटलं आहे. तसंच स्किप्पी एक चांगला प्रोडक्ट असल्याचंही ते म्हणाले. शार्क टँक इंडियामध्ये आलेल्या सर्वच शार्क्सनं काबरा यांच्या या ब्रँडमध्ये गुंतवणूक केली आहे. शार्क टँक इंडियानंतर स्किप्पीचे फाऊंडर रवी यांची भेट घेऊन चांगलं वाटलं. स्किप्पी एक चांगला प्रोडक्ट आहे आणि शार्क टँक इंडियाच्या सर्वात यशस्वी उद्योगांपैकी एक आहे. यांच्या कंपनीची विक्री ४० पट वाढली आहे, असं अशनीर ग्रोव्हर यांनी लिहिलं आहे.
पाचही शार्क्सनं केली होती गुंतवणूक
शार्क टँक इंडियामध्ये रवी काबरा आपली पत्नी अनुजा काबरा यांच्यासोबत आले होते. त्यांनी आपल्या कंपनीच्या ५ टक्के इक्विटीसाठी ४५ लाखांची मागणी केली होती. परंतु त्यांना १५ टक्क्यांच्या मोबदल्यात १ कोटी रूपये देण्यात आले. त्यांच्या या व्यवसायात पाचही शार्क्सनं गुंतवणूक केली होती. शार्क टँक इंडियामधून मिळालेल्या गुंतवणूकीमुळे आम्ही आनंदीत आहोत. या रकमेच्या माध्यमातून अधिक संशोधन आणि भारतीय बाजारपेठेत नवे प्रोडक्ट सादर करण्याची आमची योजना असल्याचंही त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं.