अमेरिकेमधील दोन मोठ्या बँका बुडाल्यानंतर आता हे बँकिंग संकट युरोपच्या दिशेने वळताना दिसत आहे. युरोपमध्ये एक आणय़ी बँक क्रेडिट डिफॉल्ट होण्याच्या मार्गावर आहे. क्रेडिट सुईसनंतर आता डॉयचे बँकेने गुंतवणुकदार आणि ठेवीदारांचं टेन्शन वाढवलं आहे. या बातमीमुळे डॉयचे बँकेचे शेअर मोठ्या प्रमाणावर कोसळताना दिसत आहेत. तसेच बँकेचे क्रेडिट डिफॉल्ट वाढून ४ वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे.
डॉयचे बँकेबाबत येत असलेल्या या नकारात्मक वृत्तांमुळे गेल्या दोन दिवसांत बँकेचे शेअर २० टक्क्यांपेक्षा अधिकने कोसळले आहेत. क्रेडिट डिफॉल्ट स्वॅप वाढल्यामुळे २४ मार्च रोजी या बँकेचे स्टॉक १४ टक्क्यांपेक्षा अधिकने तुटले होते. तर २५ मार्च रोजी ६.५ टक्क्यांनी घट दिसून आली. डॉयचे ही जर्मनीमधील सर्वात मोठी बँक आहे. तसेच संकटग्रस्त परिस्थिती असल्याने युरोपमध्ये बँकिंग सिस्टिम गडगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्ज यांनी सांगितले की, युरोपमध्ये बँकिंग सिस्टिम ही पूर्णपणे सुरक्षित आहे. तसेच गुंतवणूकदारांनी घाबरून जाण्याची शक्यता नाही. कारण डॉयचे बँक जर्मनीतील सर्वात मोठी बँक आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये तिची भूमिका महत्त्वाची आहे. जर्मनीसोबतच अनेक इतर देशांमध्ये तिच्या शाखा आहेत. या बँकेला जगातील सर्वात सुरक्षित बँक मानले गेले आहे. डॉयचे बँक सर्वाधिक कॉर्पेरेट दिग्गजांना कर्ज देते. या बँकेची एकूण संपत्ती ही १.४ ट्रिलियन डॉलर एवढी आहे.
डॉयचे बँकेवर गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणुकदारांची नजर आहे. ज्याप्रकारे क्रेडिट सुईस बँक संकटात सापडली आहे. त्याच प्रकारची परिस्थिती डॉयचे बँकेमध्ये निर्माण होत आहे. ही परिस्थिती पाहून गेल्या काही दिवसांमध्ये बँकेमध्ये लीडरशिप स्तरावर काही बदल झाले आहेत.