Join us

तीन दिवसांच्या तेजीनंतर सोने घसरले

By admin | Published: January 30, 2016 3:37 AM

सलग तीन दिवस भाववाढ झाल्यानंतर चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सोने ८५ रुपयांनी घसरून २७,0५0 प्रति १0 ग्रॅम झाले. शुक्रवारी जागतिक बाजारात सोन्याची मागणी घटली.

नवी दिल्ली : सलग तीन दिवस भाववाढ झाल्यानंतर चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सोने ८५ रुपयांनी घसरून २७,0५0 प्रति १0 ग्रॅम झाले. शुक्रवारी जागतिक बाजारात सोन्याची मागणी घटली. त्याचा परिणाम स्थानिक सराफावर झाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.विक्रीच्या दडपणाखाली चांदीही ३५0 रुपयांनी घसरली. ३५ हजारांच्या खाली येत ३४,८५0 रुपये प्रति किलो झाली. सोने गेल्या काही दिवसांपासून तीन महिन्यांतील सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते; पण परदेशात कमी उठाव आणि त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांकडून घटलेली मागणी त्यामुळे सोने घसरले. जागतिक स्तरावर सिंगापूर येथे सोने 0.१३ टक्क्यांनी घसरून १,११३.६0 अमेरिकी डॉलर प्रति औंस झाले. राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही शुद्धतेच्या सोन्याचे भाव ८५ रुपयांनी घसरून अनुक्रमे २७,0५0 रुपये आणि २६,९00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. गेल्या तीन दिवसांत सोने ५२५ रुपयांनी महागले होते.सोन्याप्रमाणेच चांदीवरही दबाव आला. त्यामुळे चांदी ३५0 रुपयांनी घसरून ३५ हजारांच्या खाली आली. त्यामुळे चांदीचा भाव ३४,८५0 रुपये प्रति किलो झाला. भाव घसरले असले तरीही नाण्याचे भाव स्थिर राहिले. १00 नाण्याच्या खरेदीचा भाव ५१ हजार रुपये आणि विक्रीचा भाव ५२ हजार रुपये असे कायम होते.