लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक पुरते हैराण झाले आहेत. अशातच लसूणही सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी आणण्याच्या तयारीत आहे. काही शहरांत दर प्रतिकिलो १८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पाटण्यात किंमत १७२ रुपये इतकी आहे, तर कोलकात्यात हाच दर १७८ रुपयांपर्यंत पोहचला आहे. महाराष्ट्रातील दर प्रतिकिलो ११० ते १६० दरम्यान पोहचले आहेत. मार्चमध्ये किरकोळ बाजारात लसणाचे दर ६० ते ८० रुपये प्रतिकिलो इतके होते. (वृत्तसंस्था)
मागच्या वर्षी शेतकऱ्यांना रडविले
मागच्या वर्षी घाऊक बाजारात लसणाचा दर खूपच कमी होता. मध्य प्रदेशातील कृषी उत्पन्न बाजारात शेतकऱ्यांचा लसूण ५ ते ८ रुपये प्रति किलो दराने खरेदी करण्यात आला होता. चांगले भाव मिळत नसल्याने नाराज झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी पिकवलेला लसूण रस्त्यात फेकून दिला होता. उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले होते.
यंदा शेतकऱ्यांना चांगला भाव
यंदा घाऊक बाजारात शेतकऱ्यांचा लसूण १५० रुपये प्रतिकिलो दराने विकत घेतला जात आहे. त्यामुळे शेतकरी खुश असला तरी यानंतर किरकोळ बाजारात पोहोचणारा लसूण चांगलाच महागलेला दिसतो. मागच्या अनुभवामुळे अनेक शेतकऱ्यांनी लसूण पिकविण्याचे प्रमाण यंदा निम्म्यावर आणले आहे.
इतर राज्यांची भिस्त मध्य प्रदेशवर
देशाच्या एकूण लसूण उत्पन्नात एकट्या मध्य प्रदेशचा वाटा ६२.८५ टक्के इतका असतो. मध्य प्रदेशातून दक्षिण भारतातील राज्ये, महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यांना लसूण पुरवला जातो. त्यामुळे मध्य प्रदेशातील लसूण महागताच इतर राज्यांतील दरही कडाडू लागतात.
पाटणा ₹ १७२ कोलकाता ₹ १७८ महाराष्ट्र ₹ ११० ते १६०
तीन-चार महिन्यांपूर्वी दर नियंत्रणात होते. मान्सूनच्या आगमनानंतर हे चित्र बदलले.