China Tops FDI Confidence Index : सध्या चीन आणि अमेरिका या दोन महासत्ता देशांमध्ये व्यापारी युद्धाचा भडका उडाला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लागू केल्यानंतर चीननेही जसास तसे उत्तर देत आयात शुल्क वाढवले आहे. शी जिनपिंगची यांची ही कृती जिव्हारी लागल्याने ट्रम्प यांनी चिनी मालावरील आयात शुल्क थेट १२५ टक्क्यांनी वाढवलं. दुसरीकडे इतर सर्व देशांवरील टॅरिफला ३ महिने स्थिगिती दिली आहे. जेणेकरुन चीनची कोंडी करता येईल. मात्र, चीनही माघार घेण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. कारण, परदेशी गुंतवणुकीत चीनचे वर्चस्व कायम आहे. याबाबतीत भारताची मात्र घसरण झाली आहे.
परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात चीन १ नंबर :
उत्पादनाच्या बाबतीत सध्यातरी चीन जगात आघाडीवर आहे. केर्नी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट (FDI) कॉन्फिडन्स इंडेक्स २०२५ नुसार, चीनने सलग चौथ्या वर्षी जगातील टॉप १० देशांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. गेल्या ३ वर्षांपासून तो नंबर १ उदयोन्मुख बाजारपेठ राहिला आहे. यावरून असे दिसून येते की जागतिक तणाव असूनही, चीन अजूनही जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे. अमेरिकेतील चीनचे राजदूत शी फेंग यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट एक्सवर याची घोषणा केली. त्यांनी लिहिले की, "गेल्या चार वर्षांपासून थेट परकीय गुंतवणुकीसाठी चीन पहिल्या १० देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या सलग ३ वर्षांपासून चीनने आपलं स्थान कायम ठेवलं आहे."
गुंतवणूकदारांना कशाची चिंता सतावत आहे? :
केर्नीचा अहवाल गेल्या ३ वर्षांतील एफडीआय ट्रेंड्सवर व्यक्त केलेल्या जागतिक गुंतवणूकदारांच्या मतांवर आधारित आहे. अहवालानुसार, ८४ टक्के गुंतवणूकदारांचा असा विश्वास आहे की पुढील ३ वर्षांत परदेशी गुंतवणूक वाढेल. वास्तविक, गेल्या वर्षीच्या तुलनेत निश्चितच थोडीशी घट होईल. हे जागतिक गुंतवणुकीच्या बाबतीत मजबूत आत्मविश्वास दर्शवते.
यामध्ये ६८ टक्के गुंतवणूकदारांनी असे सूचित केले आहे की गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी जागतिक अर्थव्यवस्था चांगली आहे. तरीही, गुंतवणूकदारांमध्ये काही चिंता अजूनही आहेत. सुमारे ३८ टक्के लोकांचा असा विश्वास आहे की जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती पुढील वर्षासाठी एक मोठा धोका असू शकतात. तर सुमारे ३५ टक्के लोकांचा असा विश्वास आहे की २०२५ मध्ये राजकीय तणाव आणखी वाढू शकतो.
वाचा - ट्रम्प यांच्या १२५% टॅरिफचा सामना चीन कसा करणार? शी जिनपिंग दाबणार अमेरिकेची दुखरी नस?
भारताचे स्थान घसरले :
उदयोन्मुख जागतिक बाजारपेठांमध्ये, चीननंतर संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, ब्राझील, भारत आणि त्यानंतर मेक्सिकोचा क्रमांक लागतो. दक्षिण आफ्रिका, पोलंड आणि अर्जेंटिना हे देखील मजबूत कामगिरी करणाऱ्या देशांच्या यादीत आहेत.