Join us

ट्विटर, मेटानंतर आता Amazon झटका देणार, १० हजार लोकांना नारळ देण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 9:09 AM

यापूर्वी मेटा आणि ट्विटरनेही कर्मचारी कपातीचे दिले होते संकेत.

ॲमेझॉन, ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज, सुमारे 10,000 लोकांना कामावरून कमी करण्याची शक्यता आहे. कॉर्पोरेट आणि टेक्नॉलॉजी या विभागातील कर्मचाऱ्यांची कपात होण्याची शक्यता आहे. या आठवड्यापासूनच यासंदर्भातील प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या घडामोडींशी परिचित असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने द न्यूयॉर्क टाइम्सने हे वृत्त दिलं आहे. रिपोर्टनुसार ॲमेझॉनचं डिव्हाईस युनिट (ज्यात वॉईस असिस्टंट ॲलेक्सा) येतं. रिटेल डिव्हिजन आणि ह्युमन रिसोर्समधील नोकऱ्यांवर प्रामुख्यानं टांगती तलवार असेल.

नोकरभरती बंदगेल्या वर्षी 31 डिसेंबरपर्यंत Amazon मध्ये 1.6 दशलक्ष पूर्णवेळ आणि अर्धवेळ कर्मचारी होते. पुढील काही महिन्यांसाठी नोकरभरती थांबवणार असल्याचंही कंपनीनं यापूर्वी सांगितलं होतं. कर्मचारी कपातीसंदर्भातील बातमी Amazon च्या विधानानंतर आली आहे, ज्यामध्ये कंपनीनं बिझी हॉलिडे सीझनच्या काळातही वाढ मंदावल्याबाबत इशारा दिला होता. अॅमेझॉन सुट्टीच्या काळात सर्वाधिक विक्री करते. वाढत्या किमतींमुळे ग्राहक आणि व्यवसायांकडे खर्च करण्यासाठी जास्त पैसे नाहीत, असे ॲमेझॉनने म्हटले होते.

मेटाही कमी करणार 11 हजार कर्मचारीसंभाव्य आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या कामगारांची संख्या कमी करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत Amazon हे एक नवीन नाव असू शकते. गेल्या आठवड्यात फेसबुकची मूळ कंपनी मेटा प्लॅटफॉर्मने खर्च कमी करण्यासाठी 11,000 हून अधिक नोकऱ्या कमी करणार असल्याचं सांगितलं होतं. याशिवाय इलॉन मस्कच्या मालकीच्या ट्विटर, तसंच मायक्रोसॉफ्ट आणि स्नॅपनेही त्यांचे कर्मचारी कमी केले आहेत.

टॅग्स :अ‍ॅमेझॉननोकरीट्विटर