Join us

दोन दिवसांच्या तेजीनंतर सेन्सेक्स घसरला

By admin | Published: July 07, 2015 10:54 PM

दोन दिवसांच्या वाढीनंतर मंगळवारी शेअर बाजार कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३७ अंकांनी घसरून २८,१७१.६९ अंकांवर बंद झाला.

मुंबई : दोन दिवसांच्या वाढीनंतर मंगळवारी शेअर बाजार कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३७ अंकांनी घसरून २८,१७१.६९ अंकांवर बंद झाला. नफा वसुलीसाठी झालेल्या जोरदार विक्रीचा फटका बाजाराला बसला. तंत्रज्ञान आणि आयटी कंपन्यांनी आजच्या घसरणीचे नेतृत्व केले. जागतिक पातळीवर संमिश्र कौल राहिला. तथापि, त्याचा बाजाराला काहीही उपयोग झाला नाही. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११.३५ अंकांनी अथवा 0.१३ टक्क्यांनी घसरून ८,५१0.८0 अंकांवर बंद झाला. ३0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीत होता. २८,३३५.२३ अंकांपर्यंत तो उसळला होता. ही सेन्सेक्सची १0 आठवड्यांची सर्वोच्च पातळी ठरली होती. त्यानंतर मात्र बाजारात विक्रीचा मारा सुरू झाला. त्यामुळे सेन्सेक्स २८,0८४.३६ अंकांपर्यंत खाली घसरला. सत्राच्या अखेरीस तो ३७.0७ अंकांची अथवा 0.१३ टक्क्यांची घसरण नोंदवून २८,१७१.६९ अंकांवर बंद झाला. बाजार सुधारणेच्या मार्गावर असतानाच नफा वसुली झाल्यामुळे सुधारणेला खीळ बसली आहे. गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्सने २६२.९६ अंकांची कमाई केली होती. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसभर ८,४८३.८५ आणि ८,५६१.३५ अंकांच्या मध्ये हेलकावे खाताना दिसून आला. ब्रोकरांनी सांगितले की, ग्रीसमधील घडामोडींची पार्श्वभूमी असतानाही रिझर्व्ह बँकेकडून दर कपातीची शक्यता गृहीत धरून विदेशी संस्थांनी बाजारातील खरेदी वाढविली होती. त्यामुळे बाजाराची सुरुवात दमदार झाली होती. तथापि, उत्तरार्धात विक्रीचा जोर वाढल्यामुळे सुरुवातीची सर्व कमाई सेन्सेक्सला गमवावी लागली. सेन्सेक्समधील वेदांता कंपनीचे समभाग सर्वाधिक घसरले. एनटीपीसी, हीरो मोटोकॉर्प, हिंदाल्को, आरआयएल, ओएनजीसी, सिप्ला, आयसीआयसीआय बँक यांचे समभाग घसरले. या उलट कोल इंडिया, एचडीएफसी, विप्रो, एसबीआय, सन फार्मा, डॉ. रेड्डीज, बजाज आॅटो, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक यांचे समभाग घसरले. तत्पूर्वी, काल विदेशी संस्थांनी १४९.३७ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. स्वदेशी गुंतवणूकदारांनी ४0९.६६ कोटींची समभाग विक्री केली. बाजारात सादर करण्यात आलेल्या हंगामी आकडेवारीतून ही माहिती समोर आली.