महाराष्ट्रात येणारा वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला यावरून राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू आहेत. अशातच आता आणखी धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. आता PhonePe या दिग्गज कंपनीनं महाराष्ट्राबाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. आपलं मुंबईतील कार्यालय कर्नाटकमध्ये स्थलांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीनं एका जाहिरातीद्वारे दिली आहे.
फोन पे नं एका वृत्तपत्रात दिलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये आपलं मुंबईतील कार्यालय कर्नाटकात स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचं म्हटलंय. फोन पे च्या या निर्णयामुळे राज्यात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच वेदांता-फॉक्सकॉननं आपला प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करण्याची घोषणा केली होती. परंतु यापूर्वी तो महाराष्ट्रात येणार असल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान, या प्रकल्पामुळे दीड लाखांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार होत्या. परंतु कंपनीनं गुजरातची निवड केली.