Adani Group companies: दिग्गज गुंतवणूकदार राजीव जैन यांच्या जीक्युजी पार्टनर्सचा (GQG Partners) गौतम अदानी समूहावरील विश्वास वाढत आहे. जीक्युजी पार्टनर्सनं मार्च तिमाहीत अदानी समूहाच्या सहा कंपन्यांमधील हिस्सा सुमारे 8,300 कोटी रुपयांनी किंवा 1 बिलियन डॉलर्सनं वाढवला. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड, अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी पोर्ट्स अँड सेझ, अदानी पॉवर लिमिटेड आणि अंबुजा सिमेंट लिमिटेड या सहा कंपन्यांमधील गुंतवणूक त्यांनी वाढवलीये.
जीक्युजीनं मार्च तिमाहीत अदानी एनर्जी सोल्युशन्समध्ये सर्वाधिक 2,316 कोटी रुपयांची भागीदारी वाढवली. यानंतर, अदानी पॉवर आणि अदानी एंटरप्रायझेसमधील हिस्सा अनुक्रमे 2138 कोटी रुपये आणि 1555 कोटी रुपयांनी वाढवला. जीक्युजीनं अदानी ग्रीन एनर्जीचे 1,369 कोटी रुपये आणि अदानी पोर्ट्समध्ये 886.10 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. त्याचप्रमाणे जीक्युजीनं 33 कोटी रुपयांचे अतिरिक्त शेअर्स खरेदी करून अंबुजा सिमेंटमधील आपला हिस्सा वाढवला.
कोणत्या कंपनीत किती हिस्सा?
जीक्युजीकडे आता अदानी एनर्जीमध्ये 4.53 टक्के स्टेक (5,183 कोटी रुपये), अदानी एंटरप्रायझेसमध्ये 3.38 टक्के स्टेक (12,298 कोटी रुपये), अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 4.16 टक्के स्टेक (12,067 कोटी रुपये), अदानी पोर्ट्समध्ये 4.07 टक्के शेअर्स (11,792 कोटी रुपये), अदानी पॉवरमध्ये 5.2 टक्के हिस्सा (10,719 कोटी रुपये) आणि अंबुजा सिमेंटमध्ये 1.9 टक्के हिस्सा (2,260 कोटी रुपये) आहे.
संकटकाळातही केली मदत
गेल्या वर्षी हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर, जेव्हा अदानी समूहाचे शेअर्स आपटले होते, तेव्हा जीक्युजीनं त्यांच्यावर विश्वास दाखवला होता. मार्च 2024 च्या तिमाहीत अदानी समूहातील सहा कंपन्यांमधील जीक्युजी पार्टनर्सच्या स्टेकचं मूल्य मागील तिमाहीच्या तुलनेत 33 टक्क्यांनी वाढून 54,300 कोटी रुपये झालं आहे.