Gautam Adani News : हिंडेनबर्गनं यापूर्वी अदानी समूहावर अनेक आरोप केले होते. त्यानंतर समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली होती. त्यानंतर हिंडेनबर्गनं बाजार नियामक सेबीवरही आरोप केले होते. परंतु दोघांनीही ते आरोप फेटाळून लावले. परंतु आता पुन्हा एकदा हिंडेनबर्गनं अदानींवर एक मोठा बॉम्ब फोडला आहे. स्विस अधिकाऱ्यांनी अदानीच्या मनी लॉन्ड्रिंग आणि फसवणुकीच्या तपासाचा भाग म्हणून अनेक बँक खात्यांमध्ये जमा केलेले ३१ कोटी डॉलर्स (सुमारे २६०० कोटी रुपये) गोठवले असल्याचा दावा हिंडेनबर्गनं आता केलाय. तसंच २०२१ पासून ही चौकशी सुरू असल्याचं म्हटलंय.
हिंडेनबर्गनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. अदानी समूहाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग आणि सिक्युरिटीज फ्रॉडच्या आरोपांच्या चौकशीचा एक भाग म्हणून स्विस अधिकाऱ्यांनी सहा स्विस बँक खात्यांमध्ये जमा केलेली ३१ कोटी डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम गोठवली असल्याचा आरोप हिंडेनबर्गनं केलाय. अमेरिकन शॉर्टसेलर हिंडेनबर्ग ग्रुपनं नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या स्विस क्रिमिनल कोर्टाच्या रेकॉर्डचा हवाला देत ही माहिती दिली. २०२१ पासून सुरू असलेल्या या तपासात भारतीय समूहाशी संबंधित संशयित ऑफशोर कंपन्यांशी संबंधित आर्थिक व्यवहारांवर प्रकाश टाकण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं.
स्विस मीडिया रिपोर्ट्सचा हवाला
"अदानींनी कशा प्रकारे एका सहकाऱ्याच्या सहय्यानं (फ्रन्टमॅन) BVI/मॉरिशस आणि बरमुडाच्या संशयास्पद फंडात गुंतवणूक केली हे फिर्यादींनी सांगितलं. या फंडांमधील बहुतांश पैसा अदानींच्या शेअर्समध्ये लावण्यात आला. ही माहिती स्विस क्रिमिनल कोर्टाच्या रेकॉर्ड्सवरून मिळाली," असं हिंडेनबर्गनं स्विस मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत म्हटलं.
वादाला पुन्हा उधाण
अदानी-हिंडेनबर्ग वाद संपुष्टात येत असतानाच ऑगस्टमध्ये या प्रकरणावरुन नवे आरोप करण्यात आले. २०२३ च्या सुरुवातीला शॉर्टसेलरनं अदानी समूहावर टॅक्स हेवनच्या माध्यमातून बाजाराचे नियम मोडल्याचा आरोप केला होता. हिंडेनबर्ग रिसर्चनं सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर अदानी समूहाशी संबंधित ऑफशोर फंडात गुंतवणूक केल्याचा आरोपही केला होता.
हिंडेनबर्ग रिसर्च स्टॉक्सची शॉर्टसेलिंग करते. म्हणजे ते शेअर्स घेतात आणि त्यांचे मूल्य घसरण्याची अपेक्षा असते. जेव्हा शेअरची किंमत कमी होते, तेव्हा हिंडेनबर्ग रिसर्च त्यांना कमी किंमतीत परत विकत घेते आणि नफा कमावते. अदानींसोबत झालेल्या वादामुळे हिंडेनबर्गची बरीच चर्चा झाली होती.