नवी दिल्ली : विकासाच्या छोट्याशा फायद्यासाठी आक्रमक धोरण अंगीकारल्यास भारतीय अर्थव्यवस्था अस्थिर होऊ शकते, असा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे. वित्तीय तूट वाढवून आर्थिक वृद्धीला गती देणे जोखमीचे आहे, असेही परखड मतही त्यांनी व्यक्त केले.
बृहत आर्थिक स्थिरतेबाबत ते म्हणाले की, जगभरात अस्थिरता असताना जोखीम घेता येऊ शकत नाही. सरकार आणि रिझर्व्ह बँकेने चलनफुगवटा कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न चालूच ठेवले पाहिजेत.
सी. डी. देशमुख स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. ब्राझीलचे उदाहरण देताना ते म्हणाले की, विकासाच्या छोट्याशा फायद्यासाठी आक्रमक धोरण अंगीकारल्यास अर्थव्यवस्था अस्थिर होऊ शकते. अतिरिक्त कर्जातून आर्थिक वृद्धी निर्माण करणे आणि वित्तीय तूट मजबूत करण्याचा मार्ग सोडल्यास भारतीय अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.
असे बोलले जाते की, भारताने वित्तीय स्थिती मजबुतीकरण करण्याचे प्रयत्न थांबवायला हवेत. काही लोकांचा असा तर्क आहे की, यामुळे वृद्धीला गती मिळू शकते. सध्या सरकारच्या खर्चाच्या आधारावर वृद्धीचे गुणक लहान होऊ शकते. अमाप खर्चामुळे कर्जाचे गणित बिघडेल. गेल्या वर्षभरात वित्तीय तूट कमी करण्याऐवजी ती वाढली.
वीज वितरण कंपन्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणलेली ‘उदय’ ही योजना पुढच्या आर्थिक वर्षात अमलात येईल. तेव्हा राज्यांची तूट कमी होईल, असे वाटत नाही. उलट केंद्रावरील बोजा आणखी वाढेल.
छोट्याशा फायद्यासाठी आक्रमक धोरण अर्थव्यवस्थेला घातक
विकासाच्या छोट्याशा फायद्यासाठी आक्रमक धोरण अंगीकारल्यास भारतीय अर्थव्यवस्था अस्थिर होऊ शकते, असा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला
By admin | Published: January 30, 2016 03:36 AM2016-01-30T03:36:20+5:302016-01-30T03:36:20+5:30