राजरत्न सिरसाट, अकोला
राज्यातील कृषी विद्यापीठांनी बीजोत्पादनात गती वाढवावी व जैविक खताच्या निर्मितीवर सक्षमतेने भर देण्यासाठी शासनाने कृषी विद्यापीठांना तीनपट उद्दिष्ट वाढविण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात सोमवारी मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत. दरम्यान, कृषी विद्यापीठांकडे असलेले अपुरे मनुष्यबळ व संसाधनाचा अभाव, या उद्दिष्टाला अडसर ठरत असल्याने कृषी विद्यापीठांसमोर पेच निर्माण झाला आहे.
राज्यात अकोेला येथील डॉ. पंजाबराव देशमुख, राहुरीचे (अहमदनगर) महात्मा जोतिबा फुले, परभणी येथील स्व. वसंतराव नाईक मराठवाडा आणि दापोली (रत्नागिरी) येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे. पण, या चार कृषी विद्यापीठात प्रचंड मनुष्यबळाचा अभाव असून, एकट्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दोन हजाराच्यावर पदे रिक्त आहेत. यामध्ये सर्वाधिक कृषी शास्त्रज्ञ पदांचा समावेश आहे.
शासनाने नवे कृषी महाविद्यालय सुरू केल्याने सध्या कार्यरत पदे या महाविद्यालयाकडे वळविण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने कृषी विद्यापीठांना या सर्व बाबींना न्याय देताना कसरत करावी लागत आहे. असे असताना बीजोत्पादनाचे नवे उद्दिष्ट आल्याने कृषी विद्यापीठासमोर पेच निर्माण झाला आहे.
बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यासाठी कृषी विद्यापीठाचे स्वतंत्र प्रक्षेत्र संचालक व दीडशे कर्मचारी वर्ग असायचा. तथापि प्रक्षेत्र संचालकाचे पद रद्द करण्यात आले असून, कर्मचारी नाहीत. यासोबतच पाणी आणि बीजोत्पादनासाठी लागणारे साधनेही नसल्याने, आहे तेच बीजोत्पादन करणे कृषी विद्यापीठाला जड झाले असताना शासनाने बीजोत्पादनाचे उद्दिष्ट तीनपट वाढवून कृषी विद्यापीठाची परीक्षा घेण्याचे ठरवले असल्याने एकूणच कृषी विद्यापीठांच्या वर्तुळात चर्चेचा विषय आहे.
कृषी विद्यापीठाने निर्माण केलेले ब्रिडर व पायाभूत बियाणे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) माध्यमातून शेतकऱ्यांना बिनदिक्कत उपलब्ध व्हावीत, हा शासनाचा उद्देश आहे. पण, ही अपेक्षा ठेवताना शासनाने यासाठी लागणाऱ्या बाबींवर लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली जात आहे.
कृषी विद्यापीठांना अतिरिक्त उद्दिष्ट!
राज्यातील कृषी विद्यापीठांनी बीजोत्पादनात गती वाढवावी व जैविक खताच्या निर्मितीवर सक्षमतेने भर देण्यासाठी शासनाने कृषी विद्यापीठांना तीनपट उद्दिष्ट वाढविण्याचे आदेश दिले आहेत
By admin | Published: November 22, 2015 11:41 PM2015-11-22T23:41:28+5:302015-11-22T23:41:28+5:30