नवी दिल्ली - वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. विशेषकरून नाशवंत शेतमालाची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी अर्थसंकल्पामधून मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार शेतमालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल आणि कृषी उडाण योजनेची घोषणा करण्यात आली आहे.
या योजनेनुसार दूध, मांस, मासे यासह अन्य नाशवंत कृषी पदार्थ खराब होण्यापासून वाचवण्यासाठी तसेच त्यांची वेगाने वाहतूक व्हावी यासाठी वातानुकूलित किसान रेल कोच चालवण्यात येणार आहेत. त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या मालवाहतुकीसाठी कृषी उडाण योजनासुद्धा सुरू करण्यात येणार असून, याअंतर्गत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विमानसेवा पुरवली जाणार आहे. या सेवेचे नियंत्रण कृषी मंत्रालयाकडून करण्यात येणार आहे.
FM Nirmala Sitharaman: To build a seamless national cold supply chain for perishables, Indian Railways will set up Kisan Rail through PPP model so that perishable goods can be transported quickly. Krishi Udaan will be launched by MoCA on international and national routes. pic.twitter.com/yyaN7xVO6e
— ANI (@ANI) February 1, 2020
दरम्यान, आज संसदेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचा सर्वांगीन विकास करून 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 16 कलमी विशेष कृती योजना जाहीर केली आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांना विविध सोईसवलती पुरवण्याची घोषमा वित्तमंत्र्यांनी केली आहे. शेतकऱ्यांसाठीच्या या 16 कलमी योजनेसाठी 2.83 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या मोठ्या तरतुदी
- पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या 100 जिल्ह्यात व्यापक प्रयत्न केले जातील
- पंतप्रधान कुसूम योजनेंतर्गत 20 लाख शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात येईल
- देशात 162 दशलक्ष टन धान्य साठवण क्षमता आहे. आता नाबार्ड याला जीयोटॅग करेल. तसेच धान्य साठवणीसाठी गट आणि तालुका स्तरावर नवी कोठारे बांधली जातील. त्यासाठी राज्य सरकार जमीन देऊ शकते
- दूध, मांस, मासे यांची साठवण आणि वाहतूक करण्यासाठी विशेष किसान रेल्वे धावणार
- शेतकऱ्यांसाठी कृषी उडाण योजना सुरू केली जाईल, ही विमानसेवा कृषिमंत्रालयाकडून दिली जाईल