नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २३ जुलै रोजी केंद्राचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष देण्यात आले. अर्थसंकल्पात शेतीसाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे पीएम किसान क्रेडिट कार्डबाबत करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, देशातील पाच राज्यांमध्ये जन समर्थ आधारित किसान क्रेडिट कार्ड जारी केले जातील.
किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांना कमी व्याजावर कर्ज देते. या अल्प मुदतीच्या कर्जामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यास मदत होते. कमी व्याजदरामुळे शेतकऱ्यांना कर्जावर कमी व्याज द्यावे लागत आहे. शेतकऱ्यांना कृषी कार्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ४ टक्के व्याजदराने ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. शेतकऱ्यांना सावकारांकडून मिळणाऱ्या कर्जापेक्षा हे कर्ज खूपच स्वस्त आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सहज कर्ज मिळते.
दरम्यान, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी इतरही घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या आहेत. यानुसार, शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार आहे. कृषीक्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढवण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. १.५२ लाख कोटींची कृषी क्षेत्रासाठी तरतूद करण्यात आली आहे. सोयाबीन, सूर्यफूल बियांची साठवण वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच ३२ फळ आणि १०९ भाज्यांच्या जाती वितरित करण्यात येणार आहे. नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यात येणार आहे. डाळ आणि तेलबियांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यावर सरकारचा भर असणार आहे.
काय मिळतात पीएम किसान क्रेडिट कार्डचे फायदे?जास्त व्याज टाळण्यासाठी शेतकरी हे कार्ड वापरतात. पीएम किसान क्रेडिट कार्डसाठी पात्रता वय १८ ते ७५ वर्षे आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत, मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास ५० हजार रुपयांपर्यंत आणि इतर जोखमींसाठी २५ हजार रुपयांपर्यंत कव्हरेज दिले जाते. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना बचत खाते, स्मार्ट कार्ड आणि डेबिट कार्डही दिले जातात. हे क्रेडिट ३ वर्षांसाठी वैध राहते आणि पीक कापणीनंतर शेतकरी त्यांच्या कर्जाची परतफेड करू शकतात.
(यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारनं कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष दिलं? वाचा सविस्तर...)
ऑनलाइन करू शकता पीएम किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज?सर्वात आधी शेतकऱ्याला ज्या बँकेतून पीएम किसान क्रेडिट कार्ड घ्यायचे आहे, त्या बँकेच्या वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर किसान क्रेडिट कार्डचा पर्याय निवडावा लागेल आणि अर्ज करण्याच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर एक अर्ज ओपन होईल, तो शेतकऱ्याला पूर्ण भरावा लागेल. फॉर्म सबमिट केल्यानंतर बँक तुमच्याशी संपर्क करेल आणि तुमच्या माहितीची पडताळणी करेल. पडताळणीनंतर तुम्हाला तुमचे किसान क्रेडिट कार्ड मिळेल.