Join us

एका एकर शेतात फक्त १२० रोपे लावा; तगडा फायदा, करोडपती बनू शकता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 3:04 PM

How to earn money From Farming: कमी खर्चात जास्त फायदा देणारी ही शेती आहे. साल आणि पानांमध्येही औषधी गुण असतात. याचा वापर अनेक शक्तीवर्धक औषधे बनविण्यासाठी केला जातो. 

पारंपरिक शेतीमध्ये नेहमीच नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची मुलं शहराकडे वळू लागल्याने जमिनी ओस पडू लागल्या आहेत. कोकणात तर आता शेतकऱ्याची तरुण पिढी नावालाच उरली आहे. अशावेळी ही ओस पडलेली जमिन तुम्हाला करोडपती पण बनवू शकते. विकून नाही बर का, पिकवून...

सागवानाची शेती पड जागेवर केल्यास त्यातून काही वर्षांनी तुम्हाला बक्कळ कमाई होऊ शकते. कमी खर्चात जास्त फायदा देणारी ही शेती आहे. शहरांमध्ये सागवानाच्या लाकडाची मागणी मोठी आहे. फर्निचर, शोभेच्या वस्तू, दरवाजे आदींसाठी पैसे मोजले जातात. एवढेच नाही तर सागाच्या लाकडाची मागणी प्लायवूड, जहाज बांधणी, रेल्वेचे डब्बे आदींसाठी देखील असते. सागाची साल आणि पानांमध्येही औषधी गुण असतात. याचा वापर अनेक शक्तीवर्धक औषधे बनविण्यासाठी केला जातो. 

सागवानाला कधी वाळवी लागत नाही. तसेच हे लाकूड खूप काळापर्यंत टिकते. थंडीच्या ठिकाणी सागाची झाडे एवढी वाढत नाहीत. उलट कोकणातील वातावरणात, डोंगररांगांमध्ये सागाची शेती केल्यास फायद्याची ठरू शकते. 

सहसा सागवानाची शेती करण्यास कोणी धजावत नाहीत. याला कारण सागाचे झाड वाढण्यासाठी ८ ते १० वर्षे लागतात. पारंपरिक पद्धतीने शेती केल्यास १५ ते २० वर्षे लागतात. यामुळे आधुनिक पद्धतीने शेती केल्यास त्यातून कमी वेळात जास्त फायदा मिळू शकतो. सागाच्या झाडांमध्ये भाजीपाला, फुलांची शेती करून देखील तुम्ही तुमचे दररोजचे उत्पन्न सुरु ठेवू शकता. तज्ज्ञांनुसार एका एकरमध्ये सागाची १२० झाले लावता येतात. ही झाडे मोठी झाली की ती विकून करोडोमध्ये त्याची किंमत जाते.

टॅग्स :शेतकरीपैसा