Join us

सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 5:53 AM

बाजारातील सूत्रांनी सांगितले की, १५ सप्टेंबरपासून महागाईचा पारा चढण्यास सुरुवात झाली. सलग ४ दिवस खाद्य तेलाचे दर वाढत राहिले.

नवी दिल्ली : ऐन सणासुदीच्या तोंडावर देशात महागाईचा भडका उडाला असून, मागील ४ दिवसांत जीवनावश्यक वस्तूंचे विशेषत: खाद्यतेलाचे दर १२ टक्क्यांनी वाढले. 

बाजारातील सूत्रांनी सांगितले की, १५ सप्टेंबरपासून महागाईचा पारा चढण्यास सुरुवात झाली. सलग ४ दिवस खाद्य तेलाचे दर वाढत राहिले. वास्तविक बुधवारीच अन्न सचिव संजीव चोपडा यांनी सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढणार नाहीत, असे वक्तव्य केले होते. मात्र, त्यानंतर गुरुवारी पुन्हा खाद्यतेलाचे दर वाढले. यामुळे लोकांचा सणासुदीतील खर्च वाढणार आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शेंगदाणा तेल, मोहरी तेल आणि वनस्पती तेलाचे भाव वाढले आहेत. हे सरकारी भाव आहेत. बाजारातील दर यापेक्षा जास्त असू शकतात.  खाद्य तेलाचे दर ८ टक्के वाढले आहेत. १५ सप्टेंबरला सोयाबीन तेल ११८ रुपये लिटर होते, १९ सप्टेंबर रोजी ते ८ टक्के वाढून १२६ रुपये लिटर झाले. पामतेल १०० रुपयांवरून १०७ रुपये, तर सूर्यफूल तेल ११९ रुपयांवरून १२६ रुपये लिटर झाले.

खाद्यतेलाचे दर किती वाढले?

तेल    आधीचे  आताचे  वाढीचे प्रमाण

शेंगदाणा तेल    १८०    १८६    ३%

मोहरी तेल      १४२    १४८    ४%

वनस्पती तेल    १२२    १२६    ३.२५%