आशियातील एअरलाईन कंपनी एअर एशियाने भन्नाट ऑफर जारी केली आहे. ही कंपनी थोडी थोडकी नव्हेत तर ५० लाख तिकिटे फुकट वाटणार आहे. कोरोना पूर्वीच्या परिस्थितीत एअरलाईनचा व्यवसाय आल्याने या कंपनीने भारतात तसेच जगभरात मोफत फिरण्याची ऑफर जारी केली आहे.
स्वस्तात विमान तिकिटे जारी करणारी एअरलाईन म्हणून प्रसिद्ध असलेल्या या एअरलाईनच्या ऑफरचा फायदा कोणीही घेऊ शकणार आहे. मात्र, ही लिमिटेड वेळासाठी ऑफर असून १९ सप्टेंबरपासून तिकीटांच्या बुकिंगला सुरुवातही झाली आहे. याची माहिती एअरलाईनने आपल्या ट्विटर हँडलवर दिली आहे. हा सेल २५ सप्टेंबरपर्यंतच सुरु असणार आहे. या काळात फक्त तिकिटे बुक करायची आहेत. म्हणजेच तुम्हाला टूर प्लॅन करण्यासाठी पुरेसा अवधी मिळणार आहे.
एअर एशियाच्या विमानाची तिकीटे बुक केल्यावर तुम्ही १ जानेवारी २०२३ ते २८ ऑक्टोबर २०२३ या काळात मोफत हवाई प्रवास करू शकणार आहात. ही ऑफर अधिकतर आशियाई देशांसाठी आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही Langkawi, Penang, Johor Bahru, Krabi, Phu Quoc आणि सिंगापूरसारख्या देशांना भेटी देऊ शकता.
Air Asia Free Ticket ही तुम्ही त्यांची वेबसाईट किंवा त्यांच्या सुपर अॅपद्वारे बुक करू शकता. तसेच या ऑफरबाबतची अधिक माहिती तुम्ही फ्लाईट्स आयकॉनवर जाऊन पाहू शकता. याचबरोबर कंपनीने जास्त पसंतीच्या रोमँटीक डेस्टिनेशनसाठी देखील विमान सेवा सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे.
कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रकोपानंतर आता कुठे एअरलाईन कंपन्यांनी वेग पकडला आहे. अनेक कंपन्या आपला कोरोनापूर्वीचा व्यवसाय पातळी गाठण्यासाठी झगडत आहेत. यासाठी ऑफर्सची लयलूटही केली जात आहे. असे असताना स्वस्त हवाई सेवा पुरविणाऱ्या या कंपनीने या कंपन्यांना आणखीनच आव्हानात्मक स्थितीत टाकले आहे. या ऑफरमुळे एअर एशियाला नवीन ग्राहक देखील मिळणार आहेत.