नवी दिल्ली : येत्या काही दिवसांत तुम्ही विमानाने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. एअर एशियाने नवीन वर्षाच्या मुहूर्तावर शुक्रवारी आपल्या सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये बंगळुरू-कोची हवाई मार्गावरील भाडे 1,497 रुपयांपासून सुरू आहे. याशिवाय इतर मार्गांवरही सवलत उपलब्ध आहे. 25 डिसेंबर 2022 पर्यंत बुकिंगवर ऑफर उपलब्ध आहे.
या दरम्यान प्रवासी 15 जानेवारी 2023 ते 14 एप्रिल 2023 पर्यंत प्रवास करण्यासाठी बुकिंग करू शकतात. वेबसाइट www.airasia.co.in, मोबाइल अॅप आणि इतर प्रमुख बुकिंग चॅनेलवर केलेल्या बुकिंगवर ही ऑफर दिली असल्याचे एअरलाइनने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे. याशिवाय, लॉयल्टी बेनिफिट्स अंतर्गत, NeuPass मेंबर्सना वेबसाइट आणि अॅपवर बुकिंग करताना फ्रूट प्लॅटर आणि प्रायोरिटी चेक-इनचे बेनिफिट देखील मिळेल.
एअर एशिया (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड ही एअर इंडिया लिमिटेडची उपकंपनी आहे आणि टाटा समूहाचा एक भाग आहे. एअर एशिया इंडियाने 12 जून 2014 रोजी संचालन सुरू केले आणि देशभरात 50 हून अधिक थेट आणि 100 कनेक्टिंग मार्गांवर उड्डाणे चालवली जातात. एअर इंडिया एक्स्प्रेसचे सीईओ अलोक सिंग यांची एअर इंडियाच्या एअरलाइन व्यवसायाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. एअर एशिया इंडियाचे सध्याचे सीईओ सुनील भास्करन यांच्याकडे नव्या उपक्रमाची जबाबदारी देण्यात येणार आहे. ते एव्हिएशन ट्रेनिंग अॅकॅडमी पाहणार आहेत.
एअर एशियामध्ये अनेक बदलया वर्षी नोव्हेंबरमध्ये मलेशियन कंपनी एअर एशिया एअरलाइन्सने एअर एशिया इंडियामधील आपला उर्वरित 16.33 टक्के हिस्सा टाटाच्या मालकीच्या एअर इंडिया एक्सप्रेसला विकला. 2020 च्या सुरुवातीला टाटा समूहाने एअर एशिया इंडियामधील एअर एशियाचा 32.7 टक्के हिस्सा देखील विकत घेतला होता. अशाप्रकारे, या संयुक्त उपक्रम एअरलाईन्स आता पूर्णपणे टाटा समूहाच्या मालकीच्या आहेत आणि टाटा समूह एअर इंडिया एक्स्प्रेसमध्ये विलीन करण्याच्या प्रक्रियेत आहे, ही त्यांची दुसरी स्वस्त फ्लाइट सर्व्हिस देणारी कंपनी आहे.
एअर इंडिया एक्स्प्रेस आपले नेटवर्क वाढवणारविलीनीकरणानंतर एअर इंडिया एक्स्प्रेसही आपले नेटवर्क वाढवणार आहे. कंपनी 150 बोईंग 737 मॅक्स विमानांच्या ऑर्डरला अंतिम रूप देण्याच्या प्रक्रियेत आहे. सध्या दोन्ही कंपन्या स्वतंत्र कंपन्या म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या विलीनीकरणाबाबत उर्वरित नियामक औपचारिकता 2023 च्या अखेरीस पूर्ण केल्या जातील. मात्र तोपर्यंत दोन्ही कंपन्यांच्या सीईओ पदाची जबाबदारी एकाच व्यक्तीकडे राहणार आहे.