एअर इंडिया (Air India) कंपनी आता पुन्हा एकदा टाटांकडे आली आहे. जेआरडी टाटा (JRD TATA) यांनी सुरू केलेली एअर इंडिया कंपनी आता टाटा समूहानं विकत घेतली आहे. कर्जात बुडालेल्या कंपनीचा लिलाव आयोजित करण्यात आला होता आणि यात टाटा सन्स (Tata Sons) कंपनीनं १८ हजार कोटींची सर्वात मोठी बोली लावत कंपनी आपल्या नावे केली आहे. जेआरडी टाटा यांनी सुरू केलेली एअर इंडिया कंपनी एकेकाळी जगातील सर्वात प्रतिष्ठित एअरलाइन्स कंपन्यांमधील एक कंपनी होती. पण सध्या कर्जाच्या ओझ्याखाली आल्यानं कंपनीचा लिलाव करण्याची वेळ आली. इतकंच नव्हे, तर कंपनीचा लिलाव होऊ शकला नसता तर कंपनी थेट बंद करण्याचा निर्णय सरकार घेणार होतं. पण टाटांनी स्वारस्य दाखवल्यानं कंपनीचा लिलाव होऊ शकला आहे. त्यामुळे गेल्या दशकभरात एअर इंडियानं गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवून देण्याचं आव्हान टाटांनी स्वीकारलं आहे.
जेआरडी टाटा यांनी १९३२ साली एअर इंडियाला टाटा एअरलाइन्स नावानं सुरूवात केली होती. सुरुवातीच्या काळात जेआरडी टाटांच्या हातात कंपनी असताना त्यावेळी विमानातील प्रवाशांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी असणाऱ्या एअर हॉस्टेस वेस्टर्न कपड्यांमध्ये पाहायला मिळायच्या. त्यावेळी टाटा एअरलाइन्समध्ये बहुतांश एअर हॉस्टेस या अँग्लो इंडियन किंवा युरोपीय वंशाच्या होत्या.
राष्ट्रीयीकरणानंतर ड्रेस कोड बदललाएअर इंडिया १९५३ साली सरकारी अधिपत्या खाली गेली आणि १९६० च्या दशकात एअर हॉस्टेसच्या ड्रेस कोडमध्ये बदल करण्यात आले. एअर हॉस्टेसचा ड्रेस कोडमध्ये साडीचा समावेश झाला. याशिवाय चूडीदार आणि घाघरा चोळीचा देखील प्लाइट अडेंडेंटच्या ड्रेस कोडमध्ये समावेश करण्यात आला होता. भारतीय संस्कृतीचं दर्शन यातून होईल यामागचा सरकारचा उद्देश होता. सध्या एअर इंडियामध्ये साडी आणि वेस्टर्न ड्रेस कोड दोन्ही लागू आहेत.
जेआरडी टाटांचं मत काय होतं?एअर इंडियाच्या राष्ट्रीयीकरणानंतरही बराच काळ जेआरडी टाटा विमान कंपनीच्या चेअरमनपदी होते. जेआरडी टाटा यांनी एअर हॉस्टेसच्या ड्रेस कोडसह त्यांच्या प्रवाशांप्रती आचरणाच्या मुद्द्यावर अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून असायचे. १९७० साली एअरलाइन्सच्या 'कॅबिन क्रू'ला (कर्मचारी) संबोधित करताना जेआरडी टाटा म्हणाले की, "मला वाटतं आपल्या एअर हॉस्टेसना त्यांचा मेकअप आणि साडी परिधान करण्याच्या बाबतीत स्वातंत्र्य देण्याची गरज आहे. जे त्यांच्या व्यक्तिमत्त्व आणि आवडीनुसार असेल. त्यावर त्यांनी ठाम राहावं. विचित्र, हास्यास्पद आणि मोहक यातली योग्य सीमारेषा आपल्याला ओळखता आली पाहिजे"
खासगीकरणानंतर कर्मचाऱ्यांचं काय होणार?नागरी विमान मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल यांनी केलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीला एअर इंडियामध्ये एकूण १२,०८५ कर्मचारी आहेत. यात ८,०८४ कायमस्वरुपी, तर ४००१ कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर आहेत. याशिवाय एअर इंडिया एक्स्प्रेसमध्ये १४३४ कर्मचारी आहेत. लिलाव प्रक्रिया जिंकलेल्या टाटा सन्स कंपनीला पुढील वर्षभरासाठी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना काढता येणार नाही. त्यापुढील वर्षापासून कंपनीला कर्मचाऱ्यांच्या करारात वाढ करायची नसेल तर कंपनीला कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय द्यावा लागणार आहे.