टाटा समूहाची एअरलाइन एअर इंडियानं नॉन फ्लाइंग कर्मचार्यांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना (VRS) सुरू केली आहे. जानेवारी २०२२ मध्ये टाटा समूहानं एअरलाईन ताब्यात घेतल्यानंतर ही अशी दुसरी ऑफर आहे.
ही ऑफर ४० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या आणि एअरलाइनमध्ये किमान पाच वर्षांच्या सतत सेवेचा कालावधी पूर्ण केलेल्या कायमस्वरूपी सामान्य कॅडर अधिकाऱ्यांसाठी आहे. याशिवाय लिपिक किंवा नॉन स्कील श्रेणीतील कर्मचारी ज्यांनी किमान पाच वर्षे कायम सेवा पूर्ण केली आहे ते देखील यासाठी पात्र असतील. ही ऑफर ३० एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.
२१०० कर्मचाऱ्यांना संधी
सुमारे २१०० कर्मचारी या व्हीआरएससाठी स्कीमसाठी पात्र असल्याचं सूत्रांनी सांगितलं. यापूर्वी एअर इंडियानं जून २०२२ मध्ये असाच प्रस्ताव आणला होता. नव्या योजनेसाठी १७ मार्च ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज करता येईल. ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्ज करणार्या पात्र कर्मचार्यांना एक्स ग्रॅशिया व्यतिरिक्त एक लाख रुपये मिळतील. ४,२०० पात्र कर्मचार्यांपैकी सुमारे १,५०० जणांनी पहिल्यांदा ऑफर सादर करण्यात आली तेव्हा त्याचा लाभ घेतला होता.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एअर इंडियानं Vihaan.AI परिवर्तन योजना जाहीर केली, ज्याद्वारे पाच वर्षांच्या कालावधीत विविध उद्दिष्टांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तयार करण्यात आली होती. एअर इंडियाला विकसित, फायदेशीर आणि बाजारपेठेवर प्रभुत्व मिळवणारी एअरलाइन बनवणं हा या योजनेचा उद्देश आहे.