मुंबई : तुम्ही सोशल मीडियावरून एअर इंडियाकडे तिकिटांच्या थकित रकमेबाबत पाठपुरावा करीत असाल तर सावधान, कारण एअर इंडियाच्या नावे बनावट खाती उघडून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. कोरोनाकाळातील शासकीय निर्बंध, तसेच प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे नियोजित विमान फेऱ्या रद्द करण्याचे प्रमाण हल्ली वाढले आहे. परिणामी रद्द फेरीच्या तिकिटांचा परतावा मागणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. परंतु, आर्थिक तोट्यात असलेल्या विमान कंपन्या तातडीने परतावा देण्यास असमर्थ ठरत असल्याने प्रवाशांना बराच काळ पाठपुरावा करावा लागत आहे. कोरोनाकाळात संचारावर मर्यादा आल्याने बहुतांश प्रवासी सोशल मीडियावरून विमान कंपन्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही बाब हेरून ऑनलाइन भामटे सक्रीय झाले आहेत.
एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, काही व्यक्ती आमच्या कंपनीचा लोगो आणि माहिती वापरून ग्राहकांची दिशाभूल करीत आहेत. एअर इंडियाच्या नावे त्यांनी बनावट ट्विटर खाती तयार केली आहेत. एखाद्या प्रवाशाने त्या खात्यावर परतावा मागितला की अधिकृत ग्राहक सेवा केंद्र असल्याचे भासवून त्याच्याकडून सर्व वैयक्तिक माहिती मागवली जाते. तिचा वापर करून फसवणूक केल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी कोणत्याही प्रकारची माहिती देताना खात्री करून घ्यावी. एअर इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर ग्राहक तक्रार निवारण केंद्रासंदर्भात तपशील देण्यात आला आहे. त्यावर किंवा आमच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरच पाठपुरावा करावा, असे आवाहन एअर इंडियाने केले आहे.