नवी दिल्ली : जर तुम्ही दिल्ली-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये घर (स्वतःचा फ्लॅट किंवा मालमत्ता) खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण करू शकता. दरम्यान, विमान कंपनी एअर इंडिया आता देशातील काही शहरांमधील आपले अनेक फ्लॅट्स आणि इतर मालमत्ता (यात निवासी, व्यावसायिक आणि भूखंडांचा समावेश आहे) विकण्याची योजना आखत आहे. (air india e auction on 8 july 2021 you can buy own flat or property just in 13 lakh)
एअर इंडियाने या माध्यमातून 250 ते 300 कोटी रुपये जमा करण्याची योजना आखली आहे. ही मालमत्ता देशाच्या 10 मोठ्या शहरांमध्ये रहदारीच्या ठिकाणी आहे. कंपनी यासाठी ई-बोली (Online auction) घेण्यात येणार आहे. ही 8 जुलै 2021 पासून सुरू होईल आणि 9 जुलै 2021 रोजी बंद होईल.
सुरूवातीची बोली 13.3 लाख रुपयांपासून
मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, या युनिट्सची सुरूवातीची बोली 13.3 लाख रुपयांपासून सुरू आहे. ग्राहकांना दीडशे कोटी रुपयांपर्यंत बोली लावता येणार आहे. या लिलावाच्या स्लॉटमध्ये बर्याच मालमत्ता आहेत, ज्या यापूर्वी अनेकदा विक्रीसाठी ठेवल्या गेल्या आहेत.
या शहरांमध्ये मालमत्ता
एअर इंडियाने जारी केलेल्या नोटीसनुसार, मुंबईत एक निवासी प्लॉट व फ्लॅट, नवी दिल्लीत पाच फ्लॅट, बंगळुरूमध्ये एक निवासी प्लॉट आणि कोलकाता येथे चार फ्लॅट आहेत. कंपनी या सर्व मालमत्तांची विक्री करेल. त्याचप्रमाणे औरंगाबादमध्ये एक बुकिंग कार्यालय आणि स्टाफ क्वार्टर, नाशिकमधील सहा फ्लॅट्स, नागपुरात बुकिंग कार्यालय, भुजमधील एअरलाइन्सचे हाऊस आणि एक निवासी प्लॉट, तिरुअनंतपुरममधील एक निवासी प्लॉट आणि मंगळुरू येथे दोन फ्लॅट आहेत.
10 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल
एअर इंडियाने खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी यातील काही मालमत्तांमध्ये विशेषत: टियर 1 शहरांमध्ये राखीव किंमत कमी केली आहे. म्हणजेच टियर 1 शहरांमध्ये एअरलाइन्स कंपनी मालमत्ता खरेदीवर विशेष सवलत देईल. एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले की, या मालमत्तांमध्ये सुमारे 10 टक्के कपात करण्यात आली आहे.