नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षात कोरोना व्हायरसमुळे विमान वाहतूक क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र, आता देशातील कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट झाल्याने विमान वाहतूक क्षेत्र सावरण्यास सुरुवात झाली आहे. एअर इंडिया आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार टप्प्याटप्प्याने कोरोना महामारीपूर्वीच्या स्तरावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. टाटा समूहाच्या नेतृत्वाखालील कंपनीने शुक्रवारी यासंदर्भात घोषणा केली.
गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे भारतीय विमान वाहतूक क्षेत्रावर वाईट परिणाम झाला आहे आणि देशातील सर्व विमान कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली आहे. एअर इंडियाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर वैमानिकांचा उड्डाण भत्ता, विशेष वेतन आणि वाइड बॉडी भत्ता अनुक्रमे 35 टक्के, 40 टक्के आणि 40 टक्के कपात करण्यात आला आहे. कंपनीने म्हटले आहे की, यावर्षी 1 एप्रिलपासून हे तीन भत्ते 20 टक्के, 25 टक्के आणि 25 टक्के केले जात आहेत.
माहितीनुसार, कोरोना महामारीच्या काळात केबिन क्रू मेंबर्सचा उड्डाण भत्ता आणि वाइड बॉडी भत्ता अनुक्रमे 15 आणि 20 टक्क्यांनी कमी करण्यात आला होता. हे दोन्ही भत्ते 1 एप्रिलपासून अनुक्रमे 10 टक्के आणि 5 टक्के बहाल करण्यात येत आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे भत्ते अनुक्रमे 50 टक्के आणि 30 टक्के कमी करण्यात आले होते. आता 1 एप्रिलपासून अधिकाऱ्यांचे भत्ते 25 टक्क्यांवर आणले जात आहेत, तर इतर कर्मचाऱ्यांचे भत्ते महामारीपूर्वीच्या स्तरावर आणले जात आहेत. हा बदल नियमित आणि निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात असेल असे कंपनीने म्हटले आहे.
इतर भत्त्यांमध्ये कोणताही बदल नाहीपायलट, केबिन क्रू आणि त्यांच्या विभागातील इतर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विशिष्ट भत्त्यांच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे कंपनीने म्हटले आहे. मार्च 2022 मध्ये तो जसा आहे तसाच राहील. याशिवाय वैमानिकांच्या ओव्हरटाइम वेतनाचा पुन्हा आढावा घेण्यात आला असून त्यासाठी स्वतंत्रपणे चर्चा केली जात आहे. याशिवाय, भविष्यात इतर सर्व कपातीचा आढावा घेतला जाईल आणि त्यानुसार कर्मचाऱ्यांना माहिती दिली जाईल, असे एअर इंडियाने म्हटले आहे.