Air India Express strike withdraws :एअर इंडिया एक्सप्रेसच्या अनेक कर्मचाऱ्यांनी अचानक आजारपणाचे कारण सांगून संप पुकारला होता. यामुळे कंपनीने 25 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले. संप पुकारल्यामुळे कंपनीला आपल्या अनेक फ्लाईट्स रद्द कराव्या लागल्या. पण, आज अखेर चर्चेअंतरी कर्मचाऱ्यांनी आपला संप माग घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निलंबित कर्मचाऱ्यांना परत कामावर घेतले घेतले जाईल, असे मुख्य कामगार आयुक्तांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्स्प्रेसमध्ये काम करणारे 300 हून अधिक कर्मचारी बुधवारपासून कामावर येत नव्हते. या सर्व कर्मचाऱ्यांनी अचानक आजारपणाचे कारण सांगून रजा घेतली आणि त्यांचे मोबाईलदेखील बंद केले. कर्मचाऱ्यांच्या सामुहिक सुट्टीमुळे बुधवार आणि गुरुवारी अनेक उड्डाणे रद्द करावी लागली. यानंतर कंपनीने 25 केबिन क्रू मेंबर्सना बडतर्फ केले. याशिवाय अन्य कर्मचाऱ्यांनाही गुरुवारी दुपारी चार वाजेपर्यंत नोकरीवर रुजू होण्याचा अल्टिमेटम देण्यात आला.
यानंतर एअर इंडिया एक्स्प्रेसचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा एक गट मुख्य कामगार आयुक्तांना भेटला आणि संप मागे घेण्याचे मान्य केले. चर्चेअंती कंपनीने आपल्या सर्व बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावार घेण्यास होकार दिला. याशिवाय कंपनीने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्याचे मान्य केले आहे.
यापूर्वीही विरोध झाला होता
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या कर्मचाऱ्यांनी विरोध किंवा बंड केल्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या महिन्यात, एअर इंडिया एक्स्प्रेसच्या केबिन क्रूच्या एका विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनियनने आरोप केला होता की एअरलाइनचे व्यवस्थापन योग्यरित्या काम करत नाही आणि कर्मचाऱ्यांच्या वागणुकीत समानतेचा अभाव आहे. एअर इंडिया एक्सप्रेस एम्प्लॉईज युनियन (AIXEU) या नोंदणीकृत युनियनने आरोप केला होता की, गैरव्यवस्थापनामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर परिणाम झाला आहे.