Fare Lock : टाटा ग्रुपची (Tata Group) विमान कंपनी एअर इंडियाने (Air India) आपल्या प्रवाशांसाठी एक खास सेवा सुरू केली आहे. याअंतर्गत आता प्रवाशांना विमानाच्या भाड्यावर नियंत्रण ठेवता येणार आहे. एअर इंडियाने सांगितले की, त्यांनी फेअर लॉक (Fare Lock) सेवा सुरू केली आहे. या सेवेच्या मदतीने तुम्ही एअरलाइनवर 48 तासांसाठी तिकीटाचे भाडे लॉक करू शकाल. मात्र, त्यासाठी प्रवाशांना शुल्कही भरावे लागणार आहे.
Plan now, pay later!
— Air India (@airindia) June 5, 2024
With Air India's Fare Lock, enjoy the convenience of securing your fare for a minimal fee starting at ₹500*/USD 10* and confirming your booking within 48 hours. Available for flights scheduled at least 10 days from the booking date.#FlyAI#AirIndia… pic.twitter.com/PNJtxuKdb1
काय आहे फेअर लॉक सुविधा
या नवीन सेवेमुळे प्रवासाची आधीच प्लॅनिंग करुन ठेवणाऱ्यांसाठी खुप फायदा होणार आहे. आपल्या प्लॅनिंगदरम्यान ते 2 दिवसांसाठी भाडे लॉक करू शकतील. एअर इंडियाने सांगितले की, भाड्यात सातत्याने वाढ होत आहे, हे जागांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. अनेक वेळा तिकीट चेक करताना आणि प्रत्यक्षात बुक करताना भाडे वाढते. पण, या नवीन सेवेमुळे तुम्ही तिकीटाचे दर दोन दिवसांसाठी लॉक करू शकता. म्हणजेच, त्या दोन दिवसात भाडे वाढले, तरीदेखील तुम्हाला लॉक केलेल्या रकमेवरच तिकीट मिळेल. महत्वाची बाब म्हणजे, ही सेवा बुकिंगच्या तारखेपासून 10 दिवसांनंतर असलेल्या फ्लाइट्सवरच सेवा लागू होईल.
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर सेवा लागू होईल
कंपनीने म्हटले की, ग्राहक फ्लाइट बुक करताना फेअर लॉकचा पर्याय वापरू शकतात. देशांतर्गत फ्लाइट बुक करताना ग्राहकाला भाडे लॉकसाठी 500 रुपये द्यावे लागतील. तसेच, कमी अंतराच्या आंतरराष्ट्रीय फ्लाइटसाठी तुम्हाला रु. 850 ($10) आणि लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय फ्लाइटसाठी तुम्हाला रु. 1500 ($18) द्यावे लागतील. हे पैसे नॉन रिफंडेबल, म्हणजेच परत मिळणार नाहीत.