Join us

Air India कर्मचाऱ्यांची चांदी! 'पगार, आरोग्य विमा'सह टाटा कंपनीची आणखी एक भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 11:26 AM

यापूर्वी एअर इंडियाने कर्मचाऱ्यांना ग्रुप मेडिकल इन्शुरन्स देण्याची घोषणा केली होती.

मुंबई - टाटा समूहाने(TATA) जेव्हापासून एअर इंडिया कंपनी विकत घेतली तेव्हापासून कंपनीच्या कर्मचाऱ्यांची चांदी झाली आहे. यापूर्वी टाटा कंपनीकडून पगार कपात मागे घेण्याची घोषणा करण्यात आली होती. काही दिवसांनंतर, कंपनीने कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्यासाठी ग्रुप मेडिकल इन्शुरन्स सुरू करण्याबाबत बोलले. आता कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे.

शेअर होल्डर बनण्याची संधी

आता एअर इंडियाच्या(Air India) कर्मचाऱ्यांना शेअर होल्डर बनण्याची संधी दिली जाणार आहे. विमान कंपनीकडून कर्मचाऱ्यांना स्टॉक ऑप्शन (ESOP) दिला जाईल. या अंतर्गत ते कंपनीचे शेअर होल्डर बनू शकतील. या प्रक्रियेमागील कंपनीचा उद्देश कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारणे हा आहे. यापूर्वी २०१८ मध्ये टाटा मोटर्सनं देखील  स्टॉक ऑप्शन (ESOP) सुरू केले होते.

इंडिगो आणि स्पाइसजेटमध्येही ही सुविधा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारण्यासाठी परफॉर्मन्स इंडिकेटरही लागू केले जातील. कर्मचार्‍यांना कंपनीत राहण्‍यासाठी कंपन्या ESOP पर्याय आणतात. या अंतर्गत कर्मचाऱ्यांचा कंपनीत हिस्सा आहे. यामुळे कर्मचाऱ्याची कामगिरी सुधारते आणि तो दीर्घकाळ कंपनीत राहतो. सध्या इंडिगो आणि स्पाइसजेट या कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना स्टॉक ऑप्शनची सुविधा दिली आहे.

१५ मे पासून वैद्यकीय विमा पॉलिसी सुरू होणार

यापूर्वी एअर इंडियाने कर्मचाऱ्यांना ग्रुप मेडिकल इन्शुरन्स देण्याची घोषणा केली होती. देशभरातील मोठ्या रुग्णालयांच्या नेटवर्कमध्ये कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली होती. कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही सुविधा १५ मेपासून सुरू होणार आहे.

सर्वाधिक ७ पर्यंत सदस्य सामील होऊ शकतात

कर्मचार्‍याला एअर इंडियाने कर्मचार्‍यांना प्रदान केलेल्या ग्रुप मेडिकल इन्शुरन्समध्ये रु. ७.५ लाखांचा विमा असेल. यामध्ये एका कुटुंबातील जास्तीत जास्त ७ सदस्य सहभागी होऊ शकतात. यामध्ये कर्मचाऱ्याची पत्नी, तीन मुले आणि २ आई-वडील/सासरे यांचा समावेश असेल. कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत कर्मचारी ही विमा पॉलिसी वापरू शकतात.

पगार कपातही मागे घेतली

सुरुवातीला एअर इंडियाने कोरोनाच्या काळात टप्प्याटप्प्याने कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारातील कपात मागे घेण्याचे सांगितले होते. हा बदल १ एप्रिलपासून लागू करण्यात आला आहे. विमान चालकांचा उड्डाण भत्ता, विशेष वेतन आणि वाइड बॉडी भत्ता २० टक्के, २५ टक्के आणि २५ टक्के दिला जात आहे.

टॅग्स :टाटाएअर इंडिया