नवी दिल्ली :
एअर इंडियाच्या पुनरुत्थानासाठी अनेक कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. बदल होण्यासाठी माझ्याकडे काही जादूची छडी नाही, निर्णयांचा परिणाम दिसायला १२ ते २४ महिन्यांचा अवधी लागेल, असे प्रतिपादन टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी केले आहे.
चंद्रशेखरन यांनी सांगितले की, एअर इंडियाचे संचालन व्यवहार्य करणे, हे एक मोठे आव्हान आहे. आम्हाला जे काही करता येणे शक्य आहे, ते सर्व करण्याची आमची तयारी आहे. मी स्वत: एअर इंडियासाठी थेट वेळ देत आहे. मात्र, कंपनीत अनेक समस्या आहेत. त्यांवर कठोरपणाने निर्णय घ्यावे लागणार आहेत. आयटी यंत्रणा, देखभालसह सर्वच विभागांत खूप काम करावे लागणार आहे.
आम्हाला तात्पुरती मलमपट्टी नको...
- चंद्रशेखरन म्हणाले की, आम्ही एअर इंडियासाठी केवळ समभागाच्या स्वरूपात सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.
- आम्ही समस्यांवर नियोजनबद्ध पद्धतीने उत्तरे शोधत आहोत. आम्हाला तात्पुरती मलमपट्टी नको आहे.
- आम्ही एअर इंडियाची सुव्यवस्थित पुनर्रचना करू इच्छितो. गुणवत्ता, प्रशिक्षण, आयटी यंत्रणा, आधुनिक ताफाच्या माध्यमातून आम्ही बदल करीत आहोत.
आम्ही एअर इंडियाला वित्तीयदृष्ट्या व्यवहार्य असलेली ‘फ्लॅगशिप’ कंपनी बनवू इच्छितो. आगामी १२ ते २४ महिन्यांत आमच्या प्रयत्नांचे दृश्य परिणाम दिसून येतील.
- एन. चंद्रशेखरन