लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : स्वेच्छा निवृत्ती योजनेचा लाभ न घेणाऱ्या व नव्याने कौशल्य शिकण्यास उत्सुक नसलेल्या सुमारे १८० कर्मचाऱ्यांना एअर इंडिया कंपनीने अलीकडेच नारळ दिला. हे कर्मचारी थेट उड्डाणसेवेशी संबंधित विभागात कार्यरत नव्हते. टाटा समूहाने एअर इंडियाचा ताबा घेतल्यानंतर कंपनीने अनेक धोरणांची पुनर्आखणी केली आहे.
कामकाजात व सेवेत देखील मोठ्या प्रमाणावर बदल केले आहेत. दरम्यानच्या काळात कंपनीने स्वेच्छा निवृत्ती योजना देखील लागू केली होती. तसेच, कंपनीच्या नव्या धोरणांनुसार काही विभागातील कर्मचाऱ्यांना कौशल्य विकासाची योजना देखील सादर केली होती. या योजनेनंतर ते कंपनीच्या नव्या धोरणांनुसार काम करू शकतील असा विचार करत ही योजना राबवली होती.
गेल्या काही आठवड्यापासून प्रक्रिया
- कर्मचाऱ्यांना कमी करण्याची प्रक्रिया काही आठवड्यांपासून असल्याची माहिती आहे. दरम्यान, सध्या कंपनीत एकूण १८ हजार कर्मचारी आहेत.
- स्वेच्छा निवृत्ती योजनेसाठी कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांपैकी १ टक्का कर्मचाऱ्यांनीही अर्ज केला नाही.
- तसेच कौशल्य योजनेत देखील फारसा रस दाखवला नसल्याची माहिती आहे. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केल्याचे समजते.