Join us  

मिहानमधील देखभाल प्रकल्पासाठी एअर इंडियाचा स्पाईस जेटशी करार

By admin | Published: August 12, 2016 3:50 AM

येथील मिहानमधील सेझ प्रकल्पातील विमानांसाठी उभारण्यात आलेल्या मेन्टेनन्स रिपेअर ओव्हरहॉल (एमआरओ) सुविधेचा वापर करण्यासाठी एअर इंडियाने

नागपूर : येथील मिहानमधील सेझ प्रकल्पातील विमानांसाठी उभारण्यात आलेल्या मेन्टेनन्स रिपेअर ओव्हरहॉल (एमआरओ) सुविधेचा वापर करण्यासाठी एअर इंडियाने खाजगी विमान वाहतूक कंपनी स्पाईसजेटसोबत करार केला आहे. ही सुविधा एअर इंडियाची आहे. एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे सीईओ एच. आर. जगन्नाथ आणि स्पाईसजेटचे उपाध्यक्ष अरुण कश्यप यांनी यासंबंधीच्या करारावर काल स्वाक्षऱ्या केल्या. एअर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. कश्यप यांनी सांगितले की, या करारानुसार, स्पाईसजेट आपल्या ताफ्यातील विमाने देखभाल आणि दुरुस्तीसाठी तात्काळ एमआरओ सुविधेत पाठविणार आहे. स्पाईसजेटच्या ताफ्यात ४२ विमाने आहेत. याशिवाय आणखी १00 विमाने खरेदी करण्याची तयारी कंपनीने चालविली आहे. स्पाईसजेटची विमाने आगामी २ महिन्यांच्या आत या सुविधेवर येतील. सध्या स्पाईसजेटची विमाने सध्या हैदराबादेतील जीएमआर सुविधेत जातात. नागपूर मिहान प्रकल्पातील ही सुविधा ५0 एकरवर पसरलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून असलेला हा प्रकल्प ६00 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प ३.५ कि.मी. टॅक्सीवेला जोडला गेला आहे. येथे जागतिक दर्जाच्या सुविधा दिल्या जातात. ३ हजार दिवसांच्या उड्डाणानंतर देखभाल करणे बंधनकारक असलेल्या मोठ्या विमानांसह सर्व प्रकारच्या विमानांची देखभाल करण्याची सोय येथे आहे. बोइंग विमानांसाठीही येथे विशेष सोय आहे. त्यासाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेतलेले अभियंते नेमण्यात आले आहे. या सुविधेसाठी बोइंगने निधी दिला आहे. मार्च २0११ मध्ये त्याचे काम सुरू झाले. ३.५ वर्षांत ते पूर्ण करण्यात आले. २९ डिसेंबर २0१४ रोजी हा प्रकल्प एअर इंडियाकडे हस्तांतरित करण्यात आला आणि गेल्या वर्षी २७ आॅगस्ट रोजी तो कार्यान्वित झाला. (प्रतिनिधी)