लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: अचानक आजारपणाचे कारण पुढे करत सामूहिक रजा घेत आंदोलन करणाऱ्या एअर इंडिया कर्मचाऱ्यांचा संप सायंकाळी अखेर गुरुवारी मिटला. कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारल्यानंतर कंपनीने २५ वरिष्ठ कर्मचाऱ्यांची गुरुवारी हकालपट्टी केली होती.
मात्र, कंपनीचे व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटनेत झालेल्या चर्चेदरम्यान या वादांवर तोडगा निघाला असून, हकालपट्टी केलेल्या कर्मचाऱ्यांनाही नोकरीवर परत घेण्यात आले आहे. एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीच्या ३०० पेक्षा जास्त वैमानिक व केबिन कर्मचाऱ्यांनी मंगळवारी अचानक आजारी पडल्याचे कारण देत सामूहिक रजा घेतली होती. त्यामुळे कंपनीच्या विमान सेवेला मोठा फटका बसला.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि मुख्य कामगार आयुक्तांनी याची दखल घेत कंपनीला नोटीस जारी केली होती. मात्र, दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर गुरुवारी संध्याकाळी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला व ते कामावर रुजू झाले. कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर व्यवस्थापन लवकरच तोडगा काढेल, असे आश्वासन देण्यात आले.