Join us

एअर इंडियाच्या ताफ्यात ए-३५०! ९०० विमानाचा ताबा घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 9:37 AM

एअर इंडियाने गिफ्ट सिटीद्वारे एचएसबीसीसोबत वित्त भाडेतत्त्वाच्या (फायनान्स लीज) माध्यमातून आपल्या पहिल्या ए ३५०-९०० विमानाचा ताबा घेतला आहे.

नवी दिल्ली : एअर इंडियाने गिफ्ट सिटीद्वारे एचएसबीसीसोबत वित्त भाडेतत्त्वाच्या (फायनान्स लीज) माध्यमातून आपल्या पहिल्या ए ३५०-९०० विमानाचा ताबा घेतला आहे.

देशातील पहिल्या इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर (आयएफएससी) गिफ्ट सिटीद्वारे भाडेतत्त्वावर घेतले जाणारे हे पहिले 'वाइड बॉडी' (आकाराने रुंद) विमान आहे. एअरलाइनने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, आपल्या पूर्ण मालकीची उपकंपनी एआय फ्लीट सर्व्हिसेस लिमिटेडने (एआयएफएस) हा व्यवहार पूर्ण केला आहे. या वर्षीच्या सुरुवातीला ४७० विमानांच्या ऑर्डरमधून हा पहिला वित्तपुरवठा व्यवहार आहे.एअर इंडियाचे मुख्य वाणिज्यिक आणि परिवर्तन अधिकारी निपुण अग्रवाल म्हणाले, “हा महत्त्वाचा व्यवहार गिफ्ट आयएफएससीकडून आम्ही विमान भाडेतत्त्वावर घेण्याच्या व्यवसायाच्या प्रारंभाचे प्रतीक आहे.

आपण विमान भाडेतत्त्वावर देणे व वित्तपुरवठा करण्यासाठी नियामक क्षमता विकसित करण्यासाठी भागधारकांसोबत काम करत आहोत, असे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक दीपेश शाह म्हणाले. एअर इंडियाने ही विमाने घेण्यासाठी एअरबस आणि बोईंगसोबत यावर्षी जून महिन्यात खरेदी करार केला होता. सध्या एअर इंडियाकडे ११६ विमानांचा ताफा आहे, ज्यात ४९ 'वाइड बॉडी' विमानांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :एअर इंडिया