Join us

Air India TaTa Ownership: अखेर तो दिवस आलाच! एअर इंडिया पुन्हा टाटांची झाली, पुढचे सात दिवस महत्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 8:37 AM

Ratan Tata Voice in Air India Flight: एअर इंडिया आज औपचारिकरित्या टाटा ग्रुपकडे सोपविली जाणार आहे. या कार्यक्रमाला सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन उपस्थित राहू शकतात.

कर्जामध्ये पुरती बुडालेली एअर इंडिया (Air India) ६९ वर्षांनी आज पुन्हा टाटा ग्रुपच्या स्वाधीन होणार आहे. यासाठी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात आल्या आहेत. महाराजाची सत्ता पुन्हा आणण्यासाठी टाटाने ऑनटाईम परफॉर्मन्सवर जोर दिला आहे. गुरुवारपासून एअर इंडिया टाटाने आखलेल्या योजनेनुसार उड्डाणे भरणार आहे. 

एअर इंडिया आज औपचारिकरित्या टाटा ग्रुपकडे सोपविली जाणार आहे. या कार्यक्रमाला सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन उपस्थित राहू शकतात. अशाप्रकारे जेआरडी टाटांचे स्वप्न रतन टाटा पूर्ण करणार आहेत. जेआरडी टाटा यांनी एअर इंडिया स्थापन केली होती. मात्र, तेव्हाच्या सरकारने राष्ट्रीयीकरण करत ६९ वर्षांपूर्वी ही कंपनी सरकारी अधिपत्याखाली आणली होती. गेल्या काही वर्षांपासून ही कंपनी तोट्यात सुरु होती. यामुळे सरकार ही कंपनी विकण्याचा प्रयत्न करत होती. अखेर ही कंपनी टाटाने विकत घेतली आहे. 

एअर इंडियाला रुळावर आणण्यासाठी टाटाने ऑनटाईम फरफॉर्मन्सवर जोर दिला आहे. म्हणजेच विमान सुटण्याआधी १० मिनिटे विमानाचे दरवाजे बंद होतील. तोवर जेवढे पॅसेंजर येतील तेवढ्यांना विमानाच्या क्षमतेनुसार घेण्यात येणार आहे. असा प्रकार खासगी विमान कंपन्या करतात. यामुळे सीट रिकाम्या राहत नाहीत किंवा कमी रिकाम्या राहतात. कंपनीने कर्मचाऱ्यांना मेल पाठवून आपण आज रात्रीपासून सरकारीपासून खासगी क्षेत्रात प्रवेश करत असल्याचे म्हटले आहे. तसेच पुढील सात दिवस महत्वाचे असून कंपनीची इमेज, वागणूक या काळात बदलावी लागणार आहे. 

विमानाच्या आत केल्या जाणाऱ्या घोषणेमध्ये प्रवाशांना पाहुणे म्हणून संबोधले जाईल. यासोबतच त्यांना टाटा समूहाचे चेअरमन एमेरिटस रतन टाटा यांचा रेकॉर्ड केलेला संदेशही ऐकविला जाऊ शकतो. एअर इंडियाची चार बोईंग 747 जंबो विमानेही टाटाकडे हस्तांतरित केली जात आहेत. एअर इंडियाच्या अधिग्रहणानंतर, एअरएशिया इंडिया, टीसीएस आणि टाटा स्टीलच्या अधिकाऱ्यांसह एअरलाइन चालविण्यासाठी अंतरिम व्यवस्थापन तयार केले जाईल.

टॅग्स :रतन टाटाटाटाएअर इंडिया