मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणाला राष्ट्रीय कंपनी विधि प्राधिकरणाने (एनसीएलटी) हिरवा कंदील दाखवला असून वर्षअखेरीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या विलीनीकरणानंतर एअर इंडिया ही भारतीय कंपनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित कंपनी म्हणून ओळखली जाणार आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून या दोन्ही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. याचा फटका गेल्या दोन महिन्यांत दोन्ही कंपन्यांच्या विमान सेवेला आणि परिणामी प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर बसला होता. मात्र, दोन्ही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची नाराजी दूर करण्यात येत आहे.
सध्या देशात आणि परदेशात दोन्ही कंपन्यांची अनेक विमाने एकाच मार्गावर आणि एकाच वेळी उड्डाण करतात. मात्र, विलीनीकरणानंतर त्यात सुसूत्रता येईल. त्यामुळे कंपनीची सेवा अधिक सक्षम होईल, असा दावा कंपनी प्रशासनाने केला आहे.