Join us

एअर इंडियाला हवे १५०० कोटी रुपयांचे कर्ज, खेळत्या भांडवलासाठी हवी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:38 PM

कर्जाचे ओझे आणि वित्तीय संकटासोबत खडतर स्पर्धेसह विविध समस्यांना सामोरे जात असलेल्या एअर इंडिया कंपनीने, तत्काळ खेळत्या भांडवलाची तजवीज करण्यासाठी १,५०० कोटी रुपयांच्या अल्पवधी कर्जाची मागणी केली आहे.

नवी दिल्ली : कर्जाचे ओझे आणि वित्तीय संकटासोबत खडतर स्पर्धेसह विविध समस्यांना सामोरे जात असलेल्या एअर इंडिया कंपनीने, तत्काळ खेळत्या भांडवलाची तजवीज करण्यासाठी १,५०० कोटी रुपयांच्या अल्पवधी कर्जाची मागणी केली आहे. महिनाभरात एअर इंडियाने अल्पवधी कर्जासाठी दुस-यांदा निविदा जारी केली आहे, तर दुसरीकडे सरकार हिस्सेदारी विकण्याची रूपरेखा तयार करीत आहेत. निव्वळ करदात्यांच्या आधाराने तग धरून असलेल्या एअर इंडियाने १८ आॅक्टोबर रोजी जारी केलेल्या दस्तावेजात म्हटले होते की, खेळत्या भांडवलाची पूर्तता करण्यासाठी सरकारच्या हमीसह १,५०० कोटी रुपयांच्या अल्पवधी कर्जाच्या शोधात आहोत. कर्ज जारी करण्यात आल्याच्या तारखेपासून २७ जून २०१८ पर्यंत कर्ज अवधी असेल. ही मुदत पुढे वाढविली जाऊ शकते. सरकारची हमी २७ जून २०१८ पर्यंत किंवा निर्गुंतवणुकीच्या तारखेपर्यंत असेल, असेही यात नमूद आहे. किती कर्ज देण्याची तयारी आहे, या माहितीसह बँकांनी २६ आॅक्टोबरपर्यंत जमा बोलीसह निविदा सादर करावी, अशी विनंतीही एअर इंडियाने केली आहे. बँकांकडून मंजुरीपत्र मिळाल्यानंतर, तीन कामकाजी दिवसांच्या आत अल्पवधी कर्जाची रक्कम काढली जाईल.मागच्या महिन्यातही एअर इंडियाने 3.259 कोटी रुपयांच्या अल्पवधीच्या कर्जासाठी बँकांकडून प्रस्ताव मागविले होते. या प्रस्तावातून एअर इंडियाला बँकांकडून पुरेसे कर्ज मिळाले होते की नाही? हे कळले नाही.एअर इंडियावर 50000 कोटी रुपयांचे कर्ज आहे. तत्कालीन यूपीए सरकारने एअर इंडियाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एक योजना मंजूर केली होती. कामगिरी सुधारण्याच्या शर्तीच्या अधीन एअर इंडियाला 30,231 कोटींचे साह्य सरकारकडून मिळणार होते. एअर इंडियाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासंबंधीची १० वर्षांची योजना २०१२ पासून लागू करण्यात होती. या योजनेनुसार एअर इंडियाला २६ हजार कोटी रुपये मिळाले आहेत.या वर्षी जून महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने एअर इंडियाच्या निर्गुंतवणूक प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी दिली होती. एक मंत्रिगट निर्गुंतवणुकीची रूपरेखा तयार करण्याच्या दृष्टीने काम करीत आहे.

टॅग्स :विमानतळ