नवी दिल्ली : निर्गुंतवणूक प्रक्रियेत एअर इंडियाची खरेदी करणाºया कंपनीस, एअर इंडियावरील कर्जाच्या भरमसाठ बोजाची चिंता करण्याची गरज नाही. कारण या कर्जाचा मोठा हिस्सा कंपनीच्या विक्रीपूर्वीच ‘विशेष उद्दिष्ट वाहन’ म्हणजेच अन्य एखाद्या कंपनीकडे (एसपीव्ही) हस्तांतरित करण्यात येणार आहे.वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखालील समितीने कर्ज हस्तांतरणाचा निर्णय ३० आॅगस्ट रोजीच घेतला आहे. एअर इंडियावरील कर्जाचा मोठा हिस्सा आणि मालमत्ता सरकार संचालित एसपीव्हीकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. केवळ विमान खरेदीसाठी घेतलेले कर्जच एअर इंडियाच्या खात्यावर राहील. तेवढा बोजा खरेदीदाराकडे जाईल. या निर्णयामुळे एअर इंडिया खरेदीचा व्यवहार इच्छुक कंपन्यांसाठी अधिक लाभदायक होणार आहे.अन्य एका अधिकाºयाने सांगितले की, एअर इंडियावर ५२ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यातील खेळत्या भांडवलासाठी घेण्यात आलेले ३३ हजार कोटींचे कर्ज एसपीव्हीकडे हस्तांतरित करण्यात येईल. उरलेले कर्ज विमानांच्या खरेदीसाठी घेण्यात आले आहे. हे कर्ज एअर इंडियासोबत राहील. ते खरेदीदाराकडे हस्तांतरित होईल. खेळत्या भांडवलाचे कर्ज एसपीव्हीकडे हस्तांतरित झाल्यानंतर, एअर इंडियाचे मूल्यांकन सुधारणार आहे.सूत्रांनी सांगितले की, कंपनी कर्जाच्या बोजासह विकण्याचे सरकारने ठरविल्यास किंमत येणार नाही. कर्ज बाजूला काढून कंपनी विकल्यास चांगली किंमत येईल. कर्जाचा बोजा असल्यास एअर इंडियाचे मूल्यांकन शून्यसुद्धा असेल. या मूल्यांकनावर कंपनीची विक्री करणे वादग्रस्त ठरेल.एअर इंडियाच्या अनेक मालमत्ता कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या आहेत. त्यांची मालकी सरकारकडे आहे. त्यामुळे मालमत्ता एअर इंडिया विकू शकणार नाही. त्यांची विक्री सरकार करील, असा निर्णयही जेटलीयांच्या नेतृत्वाखालील समितीने घेतला आहे. सरकारने घेतलेल्या आणखी एका महत्त्वाच्या निर्णयानुसार, एअर इंडिया खरेदी करणाºया कंपनीला विदेशी कंपनीसोबत ४९ टक्क्यांपर्यंत विदेशी भागीदारी करता येऊ शकेल.
एअर इंडियाचा बोजा खरेदीदारावर नाही, कंपनीला चांगली किंमत मिळवून देण्यासाठी नवी शक्कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 3:04 AM